कार्यक्रमासाठी होणार्या गर्दीचा आतंकवादी अपलाभ उठवण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच
पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली जकातनाक्याच्या समोरील ‘महालक्ष्मी लॉन्स’ येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार्या ‘सनबर्न ११’ या कार्यक्रमाला विमानतळ पोलिसांनी अनुमती नाकारली. (सनबर्नसारख्या संस्कृतीद्रोही आणि कर चुकवून राष्ट्रद्रोह करणार्या कार्यक्रमाला कुठेच अनुमती देण्यात येऊ नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) रोहन हवाल यांनी या कार्यक्रमाला अनुमती प्राप्त होण्यासाठी १० नोव्हेंबरला विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
‘सनबर्न ११’ या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्याची कारणे,
१. नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नागरी आणि लष्करी विमानतळ हे १ किलोमीटर अंतरावर आहेत, तसेच विमानांची ये-जा सतत चालू असल्याने हा परिसर यापूर्वीच ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.
२. सनबर्न कार्यक्रमामध्ये आकाशात लेझर लाईट सोडली जात असल्याने विमाने विमानतळावर उतरतांना अडचण निर्माण होऊ शकते.
३. कार्यक्रमासाठी होणार्या गर्दीचा आतंकवादी संघटना अपलाभ उठवू शकतात.
४. कार्यक्रमाच्या जागेपासून जवळच पुणे-नगर महामार्ग असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात