Menu Close

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात चोपडा (जिल्हा जळगाव) येथे विराट मोर्चा

महाराष्ट्रात चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात वाढता जनक्षोभ पहाता केंद्र सरकार अशा चित्रपटांवर बंदी का आणत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मोर्च्यात उपस्थित महिला

चोपडा : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटाच्या विरोधात ३० नोव्हेंबरला चोपडा येथील क्षत्रिय राणा राजपूत समाज आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. या वेळी उपस्थित आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगितले.

१. या मोर्च्यात महिला, युवक, युवती आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय कोळी समाज संघटना, अखिल भारतीय गुर्जर महासभा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच अनेक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

२. नायब तहसीलदार पेंढारकर यांना निवेदन देऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आली. निवेदनावर राजपूत समाजाच्या सहस्रो नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराणी पद्मावतीचा इतिहास आक्षेपार्ह पद्धतीने मांडण्यात येऊन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामुळे राजपूत समाज आणि हिंदु समाज तसेच भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणावी.

३. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

४. मोर्च्याच्या वेळी नारी का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान !, माता पद्मावती के सम्मान में, हर हिंदु मैदान में !, उठ राजपूत जागा हो, राजपूत एकतेचा धागा हो !, इत्यादी घोषणांनी शहर दणाणून सोडले.

५. मोर्च्यात चोपडा तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पंचायत सभापती आत्माराम म्हाळके, उपसभापती एम्.व्ही. पाटील, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, नगरसेवक प्रकाश राजपूत, किशोर चौधरी, राजाराम पाटील, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक श्री. महेंद्र धनगर, माजी पंचायत सदस्य रमेश राजपूत, दीपक राजपूत आणि राजपूत समाजाचे अन्य समाज बांधव अन् हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. या मोर्च्यामध्ये चोपडा येथे अलकरिवाडा येथील महिला, युवक-युवती आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ते सर्व हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात आणि स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात येतात. आंदोलनामध्ये सहभागी होता यावे, यासाठी हे सर्वजण एक दिवस शेतात कामासाठी गेले नाहीत. त्यांची उपजिविका शेतावरच आहे; मात्र त्यांनी एक दिवस धर्मासाठी दिला.

२. अलकरिवाडा येथून मोर्चा ५ किलोमीटर अंतरावर होता, तरीसुद्धा तेथील हिंदू पायी चालून मोर्च्यात सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, आम्ही शेतात कामासाठी ५ किमी जाऊ शकतो, तर धर्मासाठी एक दिवस पायी जाऊ शकत नाही का ? आम्हाला कशाला गाडी हवी ?

३. धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या अनेक मुलामुलींनी मोर्च्यामध्ये सेवा केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नका ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे चित्रपटगृहचालकांना पत्र

सांगली : पद्मावती चित्रपट हा संपूर्ण राजपूत समाज आणि हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारा असल्याने तो प्रदर्शित करू नये, असे पत्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगलीतील प्रताप थिएटर, स्वरूप, समर्थ, तसेच न्यू प्राईड मल्टिप्लेक्स यांना देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री अविनाशबापू सावंत, नितीन चौगुले, हणमंतराव पवार, अंकुश जाधव, हरिदास कालीदास, अमित करमुसे, विशाल चव्हाण, सचिन पवार यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *