त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीवरून ऐन दत्तजयंतीच्या तोंडावर ३० नोव्हेंबरला पोलिसांकडून कारवाई
अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंवर कारवाई करतांना पोलीस अशी तत्परता कधी दाखवतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
तासगाव : तालुक्यातील मोराळे येथील थोर दत्तभक्त आणि नि:स्वार्थीपणे भाविकांच्या अडचणींचे निवारण करणारे श्री. भालचंद्र भिकाजी पाटील महाराज (वय ४८ वर्षे) यांना तासगाव पोलिसांनी ३० नोव्हेंबरला सायंकाळी मोराळे येथे जाऊन अटक केली. या प्रकरणी एक त्रयस्थ व्यक्ती बाबूराव शंकर जाधव यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पाटील महाराज यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ४२०, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम २ (१) (ख) (१), १, २, ५, ८ या कलमान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. श्री. पाटील महाराज यांना १ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १ दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
१. श्री. पाटील महाराज यांचा प्रत्येक गुरुवारी सत्संग असतो. या सत्संगात अनेकांना मार्गदर्शन करून आवश्यक वाटल्यास त्यांना नामजप, तसेच योग्य ते आध्यात्मिक उपाय सांगतात. गेली अनेक वर्षे महाराज हे कार्य श्री दत्तगुरूंची सेवा म्हणून करत आहेत, असे भाविकांकडून सांगण्यात आले.
२. बाबूराव जाधव यांनी श्री. पाटील महाराज यांच्या विरोधात, अंधश्रद्धा पसरवणे, भूत-पिशाच काढून दरबार घेणे, लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये घेऊन भोंदूगिरी करून फसवणूक करणे, अशा आशयाची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते आणि पोलीस ३० नोव्हेंबरला सायंकाळी श्री. पाटील महाराज यांच्या सत्संगात गेले अन् त्यांना कह्यात घेऊन अटक केली.
३. या तक्रारीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नि:स्वार्थीपणे सेवा करणार्या एका महाराजांना षड्यंत्र करून अटक करण्यात आली आहे. महाराजांच्या भक्तांपैकी कोणीही अशी तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी कारवाई करण्याअगोदर शहानिशा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेक भक्तांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात