Menu Close

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तात्काळ सुधारा, अन्यथा आंदोलन करणार ! – हिंदु जनजागृती समितीची शासनाला चेतावणी

हिंदु जनजागृती समितीचे सुराज्य अभियान

  • गंभीर रुग्णांना उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूर येथे जाण्याची वेळ
  • आंदोलने, निवेदने देऊनही शासन ढिम्म
उपजिल्हाधिकारी विजय जोशी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना (१) श्री. गजानन मुंज, (२) श्री. आनंद नाईक आणि इतर

सिंधुदुर्ग : जनतेला उत्तम आरोग्यसेवा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. विविध प्रकारे प्रतिवर्षी जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा कर शासन गोळा करते. असे असतांनाही स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आरोग्याशी संबंधित पुरेशा सेवा शासन देऊ शकलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांपासून ते कनिष्ठ कर्मचार्‍यांपर्यंतची सर्वच पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. परिणामी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने तापसरी, मोठे अपघात, गंभीर आजार, साथीचे रोग अशा विविध स्तरांवरील रुग्णांना, तसेच प्रसूतीसाठी एकतर खाजगी रुग्णालये अथवा कोल्हापूर किंवा गोवा राज्यातील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने जिल्ह्याताल सर्व शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे १ मासाच्या आत भरून जिल्ह्याला तात्काळ उत्तम आरोग्यसेवा पुरवावी, अन्यथा उपरोक्त न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे विस्कळीत झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांद्वारे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना आरोग्य यंत्रणा सुधारावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी स्वीकारले.

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत एकूण ८२५ विविध पदांना मान्यता मिळालेली असूनही त्यातील २८९ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, मनोविकृती शास्त्रज्ञ अन् वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या मान्यता मिळालेल्या १८ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षक मान्यता मिळालेल्या १० पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत आणि वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ची मान्यता मिळालेल्या ३१ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. (एवढी पदे रिक्त असलेली ही रुग्णालये कि रुग्णांना आणून ठेवायची गोदामे आहेत ? – संपादक)

जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांतील रिक्त पदे

जिल्हा रुग्णालय, कणकवली, सावंतवाडी आणि शिरोडा या उपजिल्हा रुग्णालयांसह सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची ९५ पैकी ४६ पदे रिक्त आहेत.  तज्ञांच्या मान्यता मिळालेल्या १२६ पदांपैकी ५९ पदे रिक्त आहेत. लिपिक संवर्गातील ६४ पदांपैकी ३१ पदे रिक्त आहे. ड संवर्गातील २२७ संमत पदांपैकी ७५ पदे रिक्त आहे. अधिपरिचारिकांच्या २८३ पदांपैकी ५९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत असून रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यातील आरोग्याची विदारक स्थिती !

प्रतिवर्षी जिल्ह्यात विविध साथींचा प्रादुर्भाव होतो. त्यांना आटोक्यात आणणे शासनाला शक्य होत नाही. त्यामुळे काही जणांना मृत्यूला सामोरे जावे लागते. गंभीर रुग्णांना गोवा, कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयांत भरती करावे लागते. जिल्ह्यात गेल्या २ मासांत तापसरीच्या साथीने १८ ते २० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी भरती होतात; मात्र त्यांना उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागते. असे असूनही आरोग्य यंत्रणनेने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली नाही. तसेच अनेक वेळेला शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठाही उपलब्ध होत नाही. रोगाचे वेळीच निदान करण्याची यंत्रणाही उपलब्ध नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारावी, यासाठी जिल्ह्यात विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याद्वारे अनेक आंदोलने झाली आहेत, तरीही ठोस कारवाई होत नसल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.

२ वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी मा. आरोग्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले. त्या वेळी त्यांनी रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सुरळीत करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हावासियांना दिले होते; प्रत्यक्षात मात्र त्याची कार्यवाही झालेली नाही. नुकतीच आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांची पाहणी केली, तेव्हा एके ठिकाणी रुग्णांना देण्यात येणारे अन्न शिजलेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती लक्षात येते, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन मुंज, श्री. आनंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे आणि अंकुश पारकर, श्री. राजन सामंत, श्री. दिलिप आठलेकर, सनातनचे श्री. वासुदेव तेंडोलकर, श्री. गुरुदास प्रभु यांचा सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *