Menu Close

काश्मीरला इस्लामीकरणापासून वाचवण्यासाठी ‘एक भारत अभियान’ आवश्यकच !

धगधगत्या काश्मीरचे वास्तव

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. सध्या सेनादलांवर स्थानिक फुटीरतावाद्यांकडून होणारी दगडफेक, आतंकवाद्यांना केले जाणारे साहाय्य, पाकचे, तसेच इसिसचे ध्वज फडकावणे, यांमुळे भारतीय राष्ट्रीयत्वाला आव्हान दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीर अधिकच धुमसत आहे. मुळात फाळणीच्या वेळीच राज्यकर्त्यांनी केलेल्या घोडचुकांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. सातत्याने धगधगत असलेल्या काश्मीरचे वास्तव या लेखमालेतून मांडण्यात येत आहे.

रामनाथी, गोवा येथे १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सहावे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनात ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे सचिव श्री. राहुल राजदान यांनी काश्मीरच्या सद्यस्थितीविषयी मनोगत व्यक्त केले. ते येथे देत आहोत.

श्री. राहुल राजदान

काय आहे ‘एक भारत अभियान’ ?

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून साडे चार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले होते. त्या हिंदूंना आजही न्याय मिळालेला नाही. या अन्यायाच्या विरोधात समाजात व्यापक जागृती करण्यासाठी देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘एक भारत अभियान’ नावाचे राष्ट्रव्यापी अभियान चालू केले. या अभियानांतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत जाहीर सभांसह विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

‘पर्यटक म्हणून नव्हे, तर तेथे शाश्‍वतपणे रहाण्यासाठीच जाणार !’

काश्मिरी हिंदूंचा निर्धार

‘वर्ष १९९० मध्ये आम्ही जेव्हा तेथून इकडे आलो, तेव्हा आमच्या मनात ही गोष्ट होती की, पर्यटक म्हणूनही तिकडे परत जायचे नाही. मला तेथे जाण्याची अनेकदा संधी मिळाली; पण मी त्याला विरोध केला. मी म्हटले की, मी तेथे जाणार नाही आणि कधी गेलोच, तर एक पर्यटक म्हणून नव्हे, तर तेथे शाश्‍वतपणे रहाण्यासाठीच जाईन.’ – श्री. राहुल राजदान

१. ‘केंद्रशासनाकडे साहाय्य मागितल्यास देशभर दंगली घडतील’, म्हणून काश्मिरी पंडितांनी साहाय्य न मागणे

‘वर्ष १९८६ मध्ये अनंतनाग येथे मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंच्या विरोधात दंगली घडवून आणल्या होत्या. त्या वेळी मुफ्ती महंमद सईद हे त्यांचे नेते होते. तेव्हा काश्मिरी पंडित एकत्र आले. ‘अनंतनागमध्ये एवढे लोक मारले जात आहेत अन् हिंदूंची घरे जाळली जात आहेत. त्यासाठी काय केले पाहिजे ?’, यावर चर्चा झाली. त्यामध्ये देहली येथे जाऊन केंद्राकडे साहाय्य मागण्याचा विचार झाला; पण सगळ्या नेत्यांनी हा विचार केला, ‘‘भारत हा एक हिंदू बहुसंख्यांक देश आहे. आपण तेथे जाऊन ‘काश्मीरमधील मुसलमान तेथील हिंदूंवर तुटून पडले आहेत’, असे सांगितले, तर देशातील वातावरण दूषित होऊन हाहाःकार माजेल आणि देशभर हिंदू-मुसलमान दंगली होतील.’’ त्यामुळे हा विचार मागे पडला.

२. मध्यम प्रकारचा हिंसाचार करण्याची काश्मिरी मुसलमानांची योजना विफल होणे

जेव्हा १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील बहुतांश हिंदूंनी तेथून पलायन केले, तेव्हा एक आशा होती की, आपण जम्मूला जाऊ, म्हणजे संपूर्ण देशातून पाठिंबा मिळेल. त्या वेळी काश्मिरी मुसलमानांच्या मनातही ही भीती होती की, जर आपण काश्मिरी हिंदूंना काही केले, तर संपूर्ण देश आपल्या विरोधात जाईल. त्यामुळे ‘मोठ्या सिद्धतेनिशी टक्कर देऊया’, असे काश्मिरी मुसलमानांनी ठरवले होते. प्रत्यक्षात देशभरातून उमटणारी प्रतिक्रिया पहाता एक मध्यम प्रकारचा हिंसाचार करण्याची त्यांची योजना होती. त्यालाच आम्ही ‘आतंकवाद’ हे नाव दिलेे.

३. फुटीरतावाद्यांना कोणतीही शिक्षा न होणे आणि उलट त्यांचीच सुरक्षा वाढलेली असणे

त्या वेळी जे घडले, त्यातील एकही अतिरेकी २७ वर्षांनंतरही सापडला नाही, तसेच एखाद्याला शिक्षा झाली असेल, असे एकही प्रकरण नाही. अशा फुटीरतावाद्यांच्या जीवनात एकतर सुरक्षा आणि पैसा वाढला आहे किंवा त्यांचे मूल्य वाढले आहे. आज प्रत्येक माणूस त्यांच्या मागेपुढे फिरत आहे. सईद अली शहा गिलानी यांचे दार ठोठावणार्‍यांपैकी कोणीतरी आम्हाला भेटतो; पण ते भेटतही नाहीत, अशी स्थिती आहे.

४. आताच्या पिढीने लोकशाहीवादी भूमिका दाबली गेल्याचे सांगून बंदूक हाती घेणे

अतिरेक्यांची भीती फुटीरतावाद्यांच्या मनातूनही गेली आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मनात जर अशी भीती नसेल, तर मग हा एक पालट आहे. जी भीती वर्ष १९९० मध्ये होती, ती आज राहिलेली नाही. २७ वर्षांमध्ये एक नवी पिढी उभी राहिली असून त्यांनी कट्टर इस्लाम व्यतिरिक्तही काहीतरी वेगळे पाहिले आहे. वर्ष १९८९-१९९० मध्ये जे विचार होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रगल्भ विचार आता आहेत. त्या वेळी ते इस्लामविषयी बोलले; पण आता ते ‘निवडणुकीत अपप्रकार झाले. जी लोकशाहीवादी भूमिका होती, ती दाबली गेली’, असे सांगत आहेत. यासिन मलिकसारखे म्हणायचे, ‘‘आम्हाला एक राजकीय चळवळ उभारून निवडणूक लढवायची होत्या; पण शासनाला निवडणुका स्वच्छ वातावरणात घ्यायच्या नव्हत्या. त्यांनी आमचे अधिकार हिरावून घेतल्यामुळे आम्हाला हातात बंदूक (अग्निशस्त्र) घ्यावी लागली.’’ आताची जी मुले आहेत, ती केवळ इस्लामला काश्मीरमध्ये प्रस्थापित करण्यासाठी हातात बंदुका घेत आहेत.

५. फुटीरतावाद्यांना काश्मीरमध्ये इस्लामीकरण करून शरीयत कायदा लागू करायचा असणे

आजच्या दिवशी फुटीरतावाद्यांमध्ये एवढी क्षमता आहे की, ते ‘आम्ही हे सर्व इस्लामच्या अस्मितेसाठी करत आहोत’, असे उघडपणे सांगतात. यापेक्षा उघड आणखी काय म्हणता येईल ? हुरियतचा नेता झाकिर मुसा म्हणतो, ‘‘जे लोक ‘काश्मीरचा प्रश्‍न हा एक राजकीय प्रश्‍न आहे’, असे सांगत आहेत, त्यांनाही आम्ही सोडणार नाही; कारण ती काश्मीरची समस्या असून तेथे इस्लामीकरण करून शरीयत कायदा लागू करायचा आहे.’’ सध्याच्या त्या नेत्यांमध्ये पैशांचा लोभ वाढला आहे.

६. हिंदु भागांमध्ये सैन्याचा बंकर उभारलेला असणे  आणि त्या भागात गोळीबाराच्या खुणा आढळणे

माझे वडील आणि आजोबा यांचे मला काश्मीरमध्ये श्राद्ध करायचे होते. त्यासाठी मी एक आठवडा काश्मीरमध्ये राहिलो. हब्बा गझल या भागात ‘गणपति यार्ड’ नावाचे एक श्री गणपति मंदिर आहे. त्या भागात हिंदूंची काहीशी अधिक संख्या होती, म्हणजे तेथे मुसलमानांच्या तुलनेत हिंदू अल्पसंख्यांक असले, तरीही अन्य भागांच्या तुलनेत संख्या अधिक होती. मंदिराकडे जात असतांना चालकाला तो परिसर ओळखू येत नव्हता; कारण त्या भागात सैन्याचा एक बंकर बनला होता आणि तेथे निळे पत्रे लावलेले होते, तसेच पुढे-मागे वाळूची पोती होती. तेथील सैनिकांनी मला त्यामधून वाट काढत मंदिराकडे जायला सांगितले. तेथे गोळीबार झाल्याच्या अनेक खुणा होत्या.

७. काश्मीरमध्ये एकही मंदिर सैनिकांच्या बंदोबस्ताविना नसणे

तेथे अनेक मंदिरे होती. मी माझ्या भेटीच्या कालावधीत ती सगळी मंदिरे पहाण्याचा प्रयत्न केला होता. तेथील एकही मंदिर सैनिकांच्या बंदोबस्ताविना नव्हते. मग ते शंकराचार्य मंदिर असो किंवा गणपति मंदिर असो. तेथे ‘ख्रु’ नावाचे श्री ज्वालामातेचे एक मंदिर आहे. चंडीगडजवळही श्री ज्वालामातेचे एक मंदिर आहे. तेथे भूमीमध्ये आपोआपच ज्योती प्रज्वलित झालेल्या असतात. त्या ज्योती प्रज्वलित करण्यासाठी कुठलेही इंधन वापरावे लागत नाही. काश्मीरमधील त्या मंदिराचीही तोडफोड करण्यात आली होती. तेथेही आग लागली होती; पण ती कशी लागली, याची माहिती मिळाली नाही. त्या ठिकाणी सैनिक असल्यामुळेच ते मंदिर वाचले होते.

८. काश्मीरमधील भिंतींवर ‘सेव्ह गाझा’ आणि ‘आयएएस्’ असे उर्दू भाषेत रंगवलेले असणे

तेथील भिंतींवर बराच मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामध्ये उर्दू भाषेमध्ये ‘सेव्ह गाझा’ आणि ‘आयएएस्’ अशा आशयाची काळ्या रंगात रंगवलेली अक्षरे आढळली, तसेच तसे कापडी फलकही लावलेले होते. वर्ष १९९० मध्ये मी असे काहीही पाहिलेले नव्हते. तेथे मला मोठ्या प्रमाणात बुरखा घातलेल्या महिला पहायला मिळाल्या आणि आता त्यांचे राहणीमान पालटले आहे.

९. इस्लामीकरण करण्यासाठी स्थानिक काश्मिरी भाषा संपवून मूळ संस्कृतीवर आघात केला जाणे

काही वर्षांपूर्वी एक काश्मिरी पंडित भेटले होते. ते भाग्यनगर (हैद्राबाद) येथे राहून पुन्हा श्रीनगरमध्ये स्थायिक होण्यास निघाले होते. त्या वेळी त्यांनी सांगितले की, माझी मुले काश्मिरी भाषा बोलू शकत नाहीत; कारण माझा अधिकाधिक वेळ कार्यालयात जातो आणि सभोवताली तेलुगू भाषा बोलली जाते. माझ्या मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा चांगल्या बोलता येतात; पण त्यांना काश्मिरी बोलणे अवघड जाते अन् त्यांना ती भाषा बोलण्याची संधीच मिळत नाही. आता काश्मीरमधील लोकही उर्दूच बोलतात. आमचा काश्मिरी मुसलमानांशी जो काही थोडा संबंध होता, तेच आता काश्मिरी भाषा सोडत आहेत.

एकाने त्याचे निरीक्षण सांगितले की, इस्लामीकरण करण्यासाठी मुसलमान पहिले काम हेच करतात की, ते तेथील भाषा संपवून लोकांना उर्दू किंवा पर्शियन भाषेकडे घेऊन जातात अन् त्याद्वारे ते मूळ संस्कृतीवरच आघात करतात. आपण जर म्हटले की, तेथील व्यक्तींचे धर्मांतर झाले आहे, तर ते पूर्वी कुठे ना कुठे काश्मिरी पंडित म्हणून राहिले आहेत. आमचा त्यांच्याशी काश्मिरी भाषेमुळे संबंध होता. आता तो हळूहळू तुटत गेला. भाषा तुटली आणि त्यांचे राहणीमानही पालटले. काश्मीरमध्ये आता जी मुले आहेत, त्यांना ‘काश्मिरी हिंदू’ म्हणजे कोण, हेसुद्धा ठाऊक नाही.

१०. पूर्वी घायाळ झालेल्या अतिरेक्याने आता धर्मांधांमध्ये भारतविरोधी संकल्पनेचा प्रसार करणे

मी काही ध्वनीचित्रफिती ‘यु-ट्यूब’ या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केल्या आहेत. त्यातील एका ध्वनीचित्रफितीमध्ये एका अतिरेक्याने स्वतःचे आतंकवादाविषयीचे अनुभव सांगितले आहेत. त्याची मुलाखत घेणारा भारतीय हिंदू असून तो डाव्या विचारसरणीचा आहे. त्या अतिरेक्याने मुलाखतीत सांगितले, ‘‘आमची चळवळ केवळ काश्मीरमध्ये आहे.’’ नंतर तो स्मितहास्य करत सांगतो, ‘‘संपूर्ण भारतात इस्लाम पसरवण्यासाठीची ही चळवळ आहे. मी या चळवळीत सक्रीय अतिरेकी म्हणून काम केले. नंतर मला गोळी लागल्याने माझ्या पायाला जखम झाली. त्यामुळे मी आता सक्रीय होऊन अतिरेकी कारवाया करू शकत नाही. सध्या मी इतर मुलांना ही संकल्पना देत आहे.’’ म्हणजे तो आता त्या संकल्पनेचा प्रसार करत आहे.

११. काश्मीरविषयी चुकीची माहिती दिली जाणे आणि प्रत्यक्षात तेथे आंतरराष्ट्रीय जिहाद वाढत जाणे

काश्मीरची सद्यस्थिती किंवा पूर्वीची स्थिती यांमध्ये आपण त्यावर तोडगा काढू शकतो. सध्या काश्मीरविषयी सांगतांना सगळ्या गोष्टी गोल गोल फिरवल्या जातात, उदा. तेथील लोकांना स्वातंत्र्य नाही. तेथे स्वच्छ वातावरणात निवडणूक घेतली जात नाही. तेथे लोकतांत्रिक अधिकार नाहीत. विद्यार्थी दगडफेक करतात आणि त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा, तसेच पॅलेट गनचा वापर केला जातो इत्यादी. खरेतर काश्मीर हीच एक समस्या आहे आणि याच एका सूत्राला भारताचे अभियान बनवले जावे. तेथे इस्लामीकरण झाले असल्यामुळे मूळचे काश्मीर राहिलेले नाही. काश्मीरमध्ये पूर्वी असलेल्या जिहादला आंतरराष्ट्रीय जिहाद्यांनी साहाय्य केल्याने आता तो वाढत चालला आहे.

१२. भाजपने ‘पीडीपी’ पक्षाशी केलेली युती, ही घातक असणे !

गेल्या अनेक वर्षांपासून शासनाचा दृष्टीकोन आणि त्यांची कार्यपद्धत पालटली आहे. मग ते वर्ष १९९० मधील काँग्रेसचे शासन असो, त्यानंतर आलेली ३ – ४ युतीची शासने असो किंवा आताचे ‘पीडीपी’ आणि भाजप युतीचे शासन असो. जेव्हा भाजपने ‘पीडीपी’ पक्षाशी युती केली, तेव्हा आमचा भ्रमनिरास झाला. आम्हाला असे वाटले की, भाजप विरोधी पक्षात बसल्याने शासन कोणतेच चुकीचे काम करू शकत नाही; कारण भाजप विरोधी पक्षात राहून तसे काम करू देणार नाही. ‘भाजप सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षच राहिलेला नाही. त्यामुळे आता काही चुकीचे झाले, तर भाजप त्याला विरोध करील, अशी स्थिती नाही’, अशी दुःखदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

१३. काश्मीरमधील इस्लामीकरण थांबवण्यासाठी ‘एक भारत अभियान’ घराघरांत पोहोचणे महत्त्वाचे !

काश्मीरचे वेगाने इस्लामीकरण होत आहे. काश्मीरचा पाकिस्तान होत आहे. ते तातडीने रोखले पाहिजे. काश्मीरचे जर पूर्ण इस्लामीकरण झाले, तर नंतर ते रोखणे अवघड होईल. त्यासाठीच ‘एक भारत अभियान’ घराघरांत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातून देशातील हिंदूंना जागृत करायचे आहे. हे अभियान केवळ हिंदूंसाठीच महत्त्वाचे नसून कोणत्याही नागरिकाला भविष्यात सुखशांतीने जगायचे असेल, तर त्याने त्यामध्ये सहभागी व्हायला हवे. तेथे होणारे इस्लामीकरण थांबवले पाहिजे, अन्यथा हिंदू, मुसलमान किंवा ख्रिस्ती असो, सर्वांनाच त्याचा सामना करावा लागेल. सर्वांना जर त्यातून वाचायचे असेल, तर हे अभियान यशस्वी झालेच पाहिजे.’

– श्री. राहुल राजदान, सचिव, ‘युथ फॉर पनून कश्मीर’.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *