साठी बुद्धी नाठी, असे सरसकट म्हणणे, हे वयाची साठी गाठणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने खरे तर अवमानास्पद ! माणसाच्या वयाची साठ वर्षे झाल्यानंतर त्याच्या बुद्धीचा आणखी विकास होत नाही, असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. काही सन्माननीय अपवाद वयाच्या साठीत नवनवीन सूत्रे, तंत्रज्ञान शिकून हा सिद्धांत खोटा ठरवतात, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! तसेच सध्या काँग्रेसचे गोव्यातील नेते एदुआर्द फालेरो यांचे झाले आहे.
१. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थेने मराठी आणि कोकणी भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्याची फालेरो यांची मागणी
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमावरून अल्पसंख्यांकांची मर्जी जपण्याच्या चुकीच्या समजाखाली सरकार इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देऊन बसले आहे. या निर्णयास भाजप आणि काँग्रेस, तसेच त्यांचे त्या त्या वेळचे सहकारी पक्षही तेवढेच उत्तरदायी आहेत. प्राथमिक शिक्षणाचा मूळ हेतूच खुंटीवर टांगून मराठी आणि कोकणी भाषांसह इंग्रजी प्राथमिक शाळांना काँग्रेस सरकारने अनुदान दिले. भाजप सरकारने हा निर्णय अधिक व्यापक बनवत अनुदानाची खिरापत चालू ठेवली. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी केवळ मराठी अन् कोकणी माध्यमांतील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान देण्याचे आवाहन करून प्राथमिक शिक्षणाची नाळ येथील मातीशी जोडलेली असली पाहिजे, यावर भर दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चर्चप्रणीत डायोसेसन संस्थेने प्राथमिक शाळांतून केवळ मराठी आणि कोकणी माध्यम चालवावे, असेही सांगितले आहे !
२. स्थानिक भाषा आल्याविना भविष्यात जगणे कठीण होईल
एदुआर्द फालेरो यांचे हे म्हणणे तर्कावर आधारित आहे. कोकणी आणि मराठी या स्थानिकांच्या मातृभाषा असल्यामुळे प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून देण्याचे समर्थनच करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिसर्या इयत्तेपासून इंग्रजी हा विषय चालू करावा. कोकणी भाषा देवनागरीतून शिकवावी म्हणजे मुलांना मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदीचाही आपोआप परिचय होईल. इंग्रजी शिकायला लागल्यानंतर रोमी कोकणी समजेल. प्राथमिक स्तरावर स्थानिक भाषांतून शिकल्यास मुलांचा शैक्षणिक आणि बौद्धिक पाया घट्ट होतो. उलट या स्तरांवर इंग्रजीतून शिक्षण दिल्यास स्थानिक भाषांशी संपर्क तुटून विद्यार्थ्यांची हानी होईल. हिंदी आणि एक तरी स्थानिक भाषा आल्याशिवाय भविष्यात जगणे कठीण होऊन जाईल. आज जगभरात राष्ट्रीय भाषा आणि राष्ट्रीय संस्कृती ही ओळख बनत चालली असतांना प्राथमिक स्तरावर इंग्रजी शिक्षणाचा हव्यास चुकीचा आहे, असे खडे बोल फालेरो यांनी सुनावले आहेत.
३. पोर्तुगीज प्रभावामुळे गोमंतकीय भारतीय संस्कृतीविषयी अजाण !
दुर्दैवाने वयामुळे राजकीय विजनवासात गेलेले एदुआर्द फालेरो यांच्या या म्हणण्याकडे सत्ताधारी पक्ष, तसेच विरोधी पक्ष असलेली त्यांची काँग्रेसही लक्ष देणार नाही. इंग्रजीच्या अनुदानाचा निर्णय शैक्षणिक असला, तरी तो राजकीय व्यासपिठावरून घेण्यात आला आहे. स्थानिक भाषांतून प्राथमिक शिक्षण दिले, तरच राष्ट्रीयत्व टिकेल, हे फालेरो यांचे म्हणणे स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारांशी नाते सांगणारे आहे. गोव्याच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हटले गेलेले कुन्हा यांनी डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स या पुस्तकाच्या प्रारंभीच सर्व भारतात स्वतःचे राष्ट्रीयत्व गमावून बसलेल्या गोमंतकियांसारखे दुसरे कोणीही नसतील, अशी भीती व्यक्त केली होती. पोर्तुगीज प्रभावामुळे केवळ पुस्तकी बुद्धीवान सिद्ध झाले आणि भारतीय संस्कृतीविषयी अजाण राहिले. परिणामी पश्चिमेकडील कोणतीही गोष्ट कौतुकानेच बघण्याची गोमंतकियांची प्रवृत्ती बनली आहे, असे निरीक्षण कुन्हा यांनी तेव्हा नोंदवले होते. आता पोर्तुगीज ऐवजी इंग्रजी या शब्दाचा पालट केला, तर दुर्दैवाने परिस्थिती तीच आहे.
४. टी.बी. कुन्हा यांनी पेटवलेली राष्ट्रवादाची ज्योत तेजोमय बनणे आवश्यक !
टी.बी. कुन्हा यांचे मुंबईत वर्ष १९५८ मध्ये निधन झाले. प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या या थोर स्वातंत्र्यसेनानीचे अंत्यविधी कॅथलिक दफनभूमीत दफन करण्यास चर्चसंस्थेने नकार दिला होता. अशाच प्रकारचा राष्ट्रवाद जागवत एदुआर्द फालेरो यांनी चर्चसंस्थेला इंग्रजीऐवजी मराठी आणि कोकणीतून प्राथमिक शिक्षण देण्यास सुनावले आहे. राज्य सरकारनेही मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देण्यासाठी मोहीम घेतली पाहिजे; परंतु इथे तर सरकार पालकशरण बनले आहे. टी.बी. कुन्हा यांनी पेटवलेली राष्ट्रवादाची ज्योत तेजोमय बनण्याऐवजी मिणमिणत आहे.
(साभार : दैनिक गोवन वार्ता, ११.११.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात