हेलसिंकी (फिनलॅण्ड) : विदेशी भाषा बोलल्याने वाणीमध्ये थकवा निर्माण होऊ शकतो आणि अखेरीस वाणीचा विकार होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले. विदेशी भाषेत बोलतांना आवाज अधिक दाबला जातो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले. त्यामुळे वाणीमध्ये थकवा निर्माण होतो आणि स्वरतंतूंवर अतिभार पडतो. परिणामी त्याचे पर्यवसान वाणीच्या विकारामध्ये होऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. (मातृभाषेतून शिक्षण आणि अधिकाधिक बोलणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते ! भारतात इंग्रजीचा स्तोम निर्माण करणारे, अधिकाधिक त्याच भाषेत बोलून स्वतःला पुढारलेले समजणारे आतातरी शहाणे होतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात