Menu Close

पेट्रोलपंपावर नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी सुराज्य अभियान या जनचळवळीस आरंभ

देशभरात ८ राज्यांत ३३ जिल्ह्यांतील ४८४ पेट्रोलपंपांवर सुराज्य अभियान राबवले !

मुंबई / पुणे : दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच पेट्रोल हेसुद्धा मानवी जीवनासाठीचा आवश्यक घटक बनला आहे. पेट्रोल भरण्यासाठी आपण पेट्रोलपंपावर जातो; मात्र बहुतांश ठिकाणी पेट्रोल अल्प देणे, तसेच भेसळयुक्त पेट्रोल देणे आदी माध्यमांतून नागरिकांची नित्य फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा एक मोठा भ्रष्टाचारच आहे. अनेकांना याविषयी माहिती असते; मात्र ते असले प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत नाहीत, तसेच भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची ज्यांची इच्छा असते, त्यांना कायद्याविषयीचे ज्ञान पुरेसे नसते. परिणामी भ्रष्टाचार्‍यांचे फावते आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. ही फसवणूक रोखण्यासाठी सुराज्य अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आता कंबर कसली आहे, अशी माहिती सुराज्य अभियानाचे संयोजक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी दिली.

असे राबवले अभियान !

८ ते १० डिसेंबर २०१७ या काळात देशभरात राबवण्यात आलेल्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, देहली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि बिहार या राज्यांतील ३५ जिल्ह्यांतील ४८४ पेट्रोलपंपांना भेट देऊन ग्राहकांचे अधिकार, तसेच पेट्रोलियम आस्थापनांनी घातलेली नियमावली यांचे पालन होते आहे कि नाही, याची पाहणी करण्यात आली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील एकूण ५५ ठिकाणी, तर पुणे अन् पिंपरी-चिंचवड येथील ६४ पेट्रोलपंपांच्या ठिकाणी जाऊन हे अभियान राबवण्यात आले. पुणे येथे १८ ठिकाणी त्रुटी आढळल्या.

या अभियानासाठी जिल्हा वैध मापन नियंत्रक अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांना यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याची विनंतीही करण्यात आली होती.

पेट्रोलपंपांवर आढळलेली दुःस्थिती

१. शासनाच्या आदेशानुसार पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरण्याव्यतिरिक्त ग्राहकांना पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास त्याची पडताळणी करण्याचे, मापात फसवणूक होत असल्यास मोजमापक यंत्राची मागणी करण्याचे अधिकार आहेत. तसेच ग्राहकांच्या वाहनांमध्ये विनामूल्य हवा भरून देणे, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था असणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अशा विविध सोयी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

२. काही ठिकाणी हे अभियान राबवणार्‍या प्रतिनिधींनाच ओळखपत्राची मागणी करण्यात आली. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, आदी सुविधांचा अभाव असल्याचे या पाहणीत दिसून आले.

३. नागरिकांची होणारी फसवणूक, असुविधा या अत्यंत गंभीर गोष्टी आहेत. त्यामुळे याविषयी त्वरित कृती करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि जनतेची लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी सुराज्य अभियानाचे संयोजक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी भारत पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय; ग्राहक संरक्षण; अन्न व नागरी पुरवठा ग्राहक मंत्रालय; वैधमापन जिल्हा नियंत्रक, तसेच राज्याचे ग्राहक मंत्रालय यांच्याकडे केली आहे. या जनहितार्थ अभियानात नागरिकांनीही यथाशक्ती सहभाग घ्यावा. अभियानात सहभागी होऊ इच्छिणार्‍या नागरिकांनी ९५९५९८४८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही अधिवक्ता सांगोलकर यांनी केले.

पुणे येथे या संदर्भात वैधमापन शास्त्राचे नियंत्रक नि.प्र. उदगले यांना निवेदने दिले. त्यांच्या वतीने निरीक्षक श्री. जाधव यांनी ते स्वीकारले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *