काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिने तिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन झाल्याची ध्वनीचित्रफीत ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी त्वरित संबंधित व्यक्तीला अटक केली. झायराच्या मागील आसनावर बसलेल्या पुरुषाने तिला पाय लावून जाणीवपूर्वक स्पर्श केल्याचा आरोप झायरा हिने केला, तर ‘झायरा हिला चुकून पाय लागला. विनयभंग करण्याचा कोणताही उद्देश नव्हता’, अशी बाजू आरोपी विकास सचदेव याने मांडली. या प्रकरणातील तथ्ये यथावकाश समोर येतीलच; पण या निमित्ताने वलयांकित व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती यांना मिळणारा न्याय आणि त्यांची घेतली जाणारी नोंद यांमध्ये किती दरी आहे आणि केवळ सोयीस्कर सूत्रे कशी हाताळली जात आहेत, हे दिसून येते.
या प्रकरणातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे झायरा हिने ‘इन्स्टाग्राम’वर या संदर्भातील चलचित्र प्रसारित केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमे आणि पोलीस यांनी त्याची मोठ्या प्रमाणात नोंद घेतली. असा अनुभव सर्वसामान्य पीडित महिलेला क्वचितच् अनुभवायला मिळतो. वलयांकित व्यक्तींची नोंद घेणारे पोलीस, तसेच प्रसिद्धीमाध्यमे सर्वसामान्य नागरिकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार यांना मात्र अपेक्षित प्रमाणात वाचा फोडत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे; किंबहुना बर्याच गंभीर प्रकरणांकडे त्यांच्याकडून कानाडोळा केला जात असल्याचेच दिसून येते. अन्यायकारक घटना घडल्यानंतर त्याची स्वतःहून नोंद घेणे सोडाच, तक्रारदार व्यक्तीला पोलिसांकडून सौजन्यपूर्ण वागणूकही अपवादानेच मिळते. तक्रार नोंदवण्याची टाळाटाळ करून अन्यायग्रस्त व्यक्तीला जेरीस आणले जाते. कायद्याच्या पातळीवर कागदोपत्री जरी सर्व नागरिक समान असले, तरी अन्यायाची नोंद घेण्याच्या संदर्भात पक्षपात दिसून येतो. ‘All are equal; but some are more equal’, असे म्हणतात, ते कदाचित् अशा प्रकारांमुळेच ! सामान्यांना एक न्याय आणि वलयांकित व्यक्तींना वेगळा न्याय, हे लोकशाहीचे अपयश आहे.
सोयीस्कर निवड
झायरा हिने तिच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केल्यानंतर संपूर्ण बॉलीवूड तिच्या पाठीशी उभे राहिले; पण हीच मंडळी जेव्हा चित्रपटसृष्टीत महिलांच्या शोषणाच्या घटना घडतात तेव्हा मात्र त्याविषयी आवाज उठवतांना दिसत नाहीत. मध्यंतरी हॉलीवूडच्या दिग्दर्शकाने केलेल्या लैंगिक छळाचा विषय समोर आल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनीही बॉलीवूडमध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याचे वक्तव्य केले होते; मात्र हा विषय पुढे उचलला गेला नाही. ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाचा सहदिग्दर्शक महंमद फारुखी यांच्यावरही मध्यंतरी बलात्काराचा आरोप झाला होता. खालच्या न्यायालयाने त्याला त्या प्रकरणी शिक्षाही केली; मात्र वरच्या न्यायालयात संशयाचा फायदा घेत फारुखी सुटले. त्यावेळी बॉलीवूड चिडीचूप बसले. बॉलीवूडमधून प्रोत्साहित केल्या जाणार्या ‘लव्ह जिहाद’मुळे आज देशभरात सहस्रो हिंदु मुलींची दिशाभूल होऊन त्या लव्ह जिहादची शिकार होत आहेत; मात्र त्याविषयीही कलावंतांमधून प्रतिक्रिया उमटत नाहीत. सोयीस्कर विषय हाताळणे, सोयीस्कररित्या मौन बाळगणे ही आपमतलबी वृत्तीच यातून दिसून येते.
या प्रकरणावरून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते. ती म्हणजे कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करायचा असेल, तर तुमची लोकप्रियता, शिक्षण हे नाही, तर मनोबल आणि आत्मबल हेच उपयोगी पडते. व्यक्ती लहान असो वा मोठी, प्रसिद्ध असो वा सामान्य, जोपर्यंत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ती सक्षम होत नाही, तोपर्यंत संकटाचा ती यशस्वीरित्या सामना करू शकत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात