पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले !
पाकमध्ये जेथे मंदिरेच पाडली जातात, तेथे मंदिरांतून मूर्ती बेपत्ता होणे यात नवीन काहीच नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : पाकच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील प्राचीन कटासराज मंदिरातील भगवान राम आणि हनुमान यांच्या मूर्ती गायब झाल्यावरून पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वीच न्यायालयाने येथील पवित्र सरोवरातील पाणी न्यून होण्यावरून सरकारला आदेश दिला होता. या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चिंता व्यक्त केली.
१. सुनावणीच्या वेळी पाकचे सरन्यायाधीश साकिब निसार यांनी विचारले की, सरकारी अधिकार्यांकडे या देवतांच्या मूर्ती आहेत कि त्या तुम्ही हटवल्या आहेत ?
२. न्या. निसार यांनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवरून मंदिरातील पवित्र सरोवराविषयी टीप्पणी केली.
३. येथील मंदिराच्या जवळ सिमेंटचे कारखाने कूपनलिकांमधून पाणी उपसत आहेत. त्यामुळे भूमीमधील पाण्याची पातळी आणखी खाली जात आहे. त्याचा परिणाम या सरोवरावर होत आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
४. यावर न्यायालयाने या कारखान्यांना विध्वंसकारी म्हटले आहे, तसेच या कारखान्यांची नावे सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयांनी कोणतीही सुनावणी करून नये, असाही आदेश दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात