कांजूरमार्ग (मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
मुंबई : इतिहासातील प्रसंग चित्रपटांतून चुकीच्या पद्धतीने मांडल्याने पहाणार्यांना तेच सत्य वाटते आणि समाजात चुकीचा संदेश जातो. बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना नाचतांना दाखवण्यात आले आहे, तर पद्मावती या आगामी चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टी इतिहासाचे विकृतीकरण करणार्या आहेत. इतिहासद्रोही चित्रपट निर्माण करून समाजात चुकीचा संदेश पसरवणार्या संजय लीला भन्साळी यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली.
कांजूरमार्ग पूर्वेतील नूतननगर चौकात १० डिसेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन करण्याचा निर्णय रहित करावा, २५ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी आणि पुणे येथील नियोजित सनबर्न फेस्टिवल रहित करण्यात यावा, या मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याच्या संदर्भात धर्माचार्यांचे मत घ्यावे ! – सचिन घाग, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूर येथीलश्री विठ्ठलाची मूर्ती ही केवळ दगडाची वस्तू नसून त्यात श्री विठ्ठलाचे तत्त्व कार्यरत आहे, अशी आमची श्रद्धा आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यावरील उपाय यांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती म्हणजे संत, धर्माचार्य, आदींचे मार्गदर्शन घेऊन धर्मशास्त्रानुसार कृती केली पाहिजे.
सनातन संस्थेचे डॉ. लक्ष्मण जठार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनीही या वेळी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनाला पंचमुखी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ कदम, सीताराम सेवा संस्थेचे श्री. पापा सिंग, बजरंग दलचे(भांडुप) श्री. विनोद जैन आणि बजरंग दल(गोरेगाव)चे श्री. संदीप सिंग उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आंदोलनाने प्रभावित झालेल्या एका राजपूत चहा विक्रेत्याने आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना अल्प मूल्यात चहा उपलब्ध करून दिला.
२. दोन स्थानिक धर्मप्रेमींनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात