कुठे हिंदूंना कटकारस्थानाद्वारे बाटवण्याचा प्रयत्न करणारे ख्रिस्ती मिशनरी, तर कुठे हिंदु धर्माचा अभ्यास करून योग्य-अयोग्य ठरवून कृती करणारे पाद्री रेव्हरंड आवर ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
१. पाद्री रेव्हरंड आवर यांनी हिंदु धर्माचा केलेला सखोल अभ्यास !
‘अमेरिकन पाद्री रेव्हरंड आवर यांना भारतात ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्यास पाठवले होते. त्यांनी पुण्याच्या जवळपासच्या भागांत प्रसारास प्रारंभ केला. ख्रिस्ती पंथाचा प्रसार करतांना काही लोकांसमोर हिंदु धर्माची निंदा आणि ख्रिस्ती पंथाची प्रशंसा करतांना पं. सीताराम गोस्वामी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही काही जाणून आणि समजून न घेता हिंदु धर्माची निंदा का करता ? तुम्ही हिंदु धर्माविषयी काही म्हणण्यापूर्वी हिंदु धर्माविषयी नीट समजून घेतले पाहिजे.’’
ही गोष्ट पाद्री आवर यांना योग्य वाटली. त्यांनी संस्कृत आणि मराठी या भाषा शिकून हिंदु धर्माचा सखोल अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी सखोल निष्ठा निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकन मिशनला पत्र लिहिले.
२. पाद्री ‘रेव्हरंड आवर’ यांचा भारतात ख्रिस्ती पंथाच्या प्रसारास नकार आणि मिशनचे त्यागपत्र !
पत्रात त्यांनी म्हटले, ‘भारतात शेकडो येशू आहेत, म्हणजेच येथे येशूसारखे अनेक संत होऊन गेले आहेत. त्यामुळे भारतात ख्रिस्ती पंथाच्या प्रसाराची काहीच आवश्यकता नाही. भारतात ख्रिस्ती पंथाचा प्रसार पूर्णपणे बंद केला पाहिजे. मी हिंदु धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून ‘भारतवर्ष हा सत्यधर्माचा अगाध समुद्र आहे’, हे जाणून घेतले आहे. त्यामुळे मी या मिशनचे त्यागपत्र देत आहे. केवळ एवढेच नव्हे, तर मी माझी ८ लक्ष रुपयांची संपत्ती ‘भारतीय इतिहास शोध मंडळा’ला अर्पण करत आहे, ज्यामुळे या मंडळाद्वारे भारतीय सद्ग्रंथांचे अनुवाद छापत रहावेत.
३. मनुष्याच्या बुद्धीला स्वातंत्र्य देणारा ‘हिंदु’ हाच एकमेव धर्म !
बुद्धीनेच माणूस हा माणूस आहे, नाहीतर मग तो आणि इतर मनुष्येतर प्राणी यांमध्ये भेद तो काय राहिला ? जे धर्म मनुष्याच्या बुद्धीला बंदीस्त करतात, ते धर्म मनुष्याचे हित नव्हे, तर अहितच करतात. त्याला कूपमंडूक बनवतात आणि त्याच्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ घालतात. जगात प्रचलित असलेले ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी, पारशी आणि बौद्ध इत्यादी धर्म हे मनुष्याच्या बुद्धीला बंदीस्त करतात. केवळ ‘हिंदु’ हाच धर्म असा आहे की, जो मनुष्याच्या बुद्धीला स्वातंत्र्य देतो. त्यामुळे मी हिंदु धर्माचा पाठीराखा आहे.
४. हिंदु धर्म मतैक्यावर नव्हे, तर आचार आणि अनुष्ठान यांवर आधारित !
ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी, बौद्ध इत्यादी धर्म हे ‘प्रचारक धर्म’ आहेत. प्रचार याचा अर्थ आहे, ‘काही विशिष्ट श्रद्धा आणि मते यांना जनसमुहामध्ये प्रचलित करणे’. जेवढे प्रचारक धर्म आहेत, ते काही विशिष्ट श्रद्धा आणि मते यांवर आधारित आहेत. त्या श्रद्धा आणि मते ही सार्वजनिक नाहीत, म्हणजेच सर्वजण त्यांना सत्य मानत नाहीत. जे या गोष्टींना सत्य मानत नाहीत, ते या धर्मांबाहेर रहातात. या धर्माची व्यापकता ही मतैक्यावर अवलंबून आहे; पण हिंदु धर्मात ही गोष्ट नाही. त्याचा प्राण हा मत नसून आचार आहे, तर विश्वास नसून अनुष्ठान आहे.
५. हिंदु धर्म हा संकुचित नव्हे, तर उदार आणि सार्वजनिक भाव असलेला धर्म !
हिंदु धर्मात विवेकाच्या प्रकाशातच श्रद्धासुमने फुलतात. यामध्ये विचारांचे स्वातंत्र्य आहे. येथे कोणी वैष्णव, कोणी शैव, तर कोणी शाक्त आहे. कोणी आस्तिक, तर कोणी नास्तिकही आहे; पण हे सर्वजण हिंदु धर्मात समाविष्ट आहेत. यांपैकी कोणीच हिंदु हा समाजातून बहिष्कृत झालेला नाही. विचारांचे हे स्वातंत्र्य आणि साधनेसाठीचे अनेक पंथ, हे केवळ हिंदु धर्मातच आहेत. यांमुळेच हिंदु धर्मात उदार आणि सार्वजनिक, हे भाव आले असून ते आपल्याला अन्यत्र दिसत नाहीत. कुठलाही प्रचारक धर्म हा ‘इतर धर्मांतही सत्य आहे’, हे मान्य करणार नाही. सर्वजण स्वतःला योग्य आणि इतरांना चुकीचे मानतात. इस्लाम म्हणतो, ‘जो मुसलमान नाही, त्याला नरकात जावे लागेल’. ख्रिस्ती पंथाच्या म्हणण्यानुसार ‘जो ख्रिस्ती नाही, त्यांना नरकयातना सोसाव्या लागतील’. याप्रकारे सर्व प्रचारक धर्म आपापल्या संकुचित विचारांचा प्रचार करून जगाचे अकल्याण करत आहेत.
६. जगातील सर्व धर्मांचा समन्वय असणारा एकमेव असा हिंदु धर्म !
सर्व प्रचारक धर्म अंधश्रद्धेच्या बळावर टिकून आहेत; पण हिंदु धर्मात ही गोष्ट नाही. भारतीय ऋषींचा हा अनादी धर्म, ज्यांमध्ये जगातील समस्त धर्मांचा सहजपणे समन्वय होऊ शकतो, तो इतर धर्मांप्रमाणे पोकळ आणि निराधार नाही. मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, हिंदु धर्म हा धर्माचा एक अगाध महासागर आहे. ज्या गोष्टी अन्य धर्मांत आहेत, त्या सर्व हिंदु धर्मात आहेतच; पण हिंदु धर्मात जे काही आहे, ते अन्य धर्मांमध्ये नाही. मी या मिशनचे त्यागपत्र देत आहे. मला बौद्धिक स्वातंत्र्याच्या वातावरणात राहू द्या.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात