Menu Close

भारत कधीकाळी खरेच आर्थिक महासत्ता होता का ?

‘पाश्‍चात्त्य देशांची अर्थव्यवस्था ही बळकट आणि समृद्ध अन् भारत हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला’, असा अपसमज आपल्याकडे पसरला आहे. ऐतिहासिक दाखले मात्र वेगळेच सांगतात. ‘भारतात सोन्याच धूर निघत होता’, असे कोणी राष्ट्रप्रेमीने म्हटल्यास त्याची खिल्ली उडवली जाते. ‘या लेखातून भारत आर्थिकदृष्ट्या कसा समृद्ध होता’, हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

१. प्राचीन काळी भारत आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे संबोधणे, ही बौद्धिक दिवाळखोरी !

१ अ. आर्थिक क्षेत्रात योगदान देण्यास भारतीय संस्कृती अपयशी ठरल्याचे उद्योजक आदि गोदरेज यांचे मत, हे त्यांचे घोर अज्ञान ! : वर्ष २०१० ची ही घटना आहे. आयआयटी मुंबईच्या ४२ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात दोन विशिष्ट वक्ते आमंत्रित होते. एक होते प्रसिद्ध उद्योगपती आदि गोदरेज आणि दुसरे होते प्रसिद्ध स्वदेशी अर्थचिंतक आणि सनदी लेखापाल स्वामिनाथन गुरुमूर्ती. श्रोत्यांमध्ये विद्वान, संशोधक, शिक्षणतज्ञ आणि अत्यंत हुशार असे विद्यार्थी होते. आदि गोदरेज यांचे भाषण अतिशय प्रभावी झाले. त्यांच्या विचारांचा सारांश सांगायचा झाला तर, ‘भारत ही अतिशय महान अशी सभ्यता (संस्कृती) राहिली आहे. तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता या क्षेत्रांत या संस्कृतीचे योगदान अद्भुत आहे. ‘इतर विचारांच्या लोकांशी सहकार्याने कसे रहावे’, हेही तिला ठाऊक आहे. केवळ एकाच क्षेत्रात ही संस्कृती अपयशी राहिली आणि ते म्हणजे आर्थिक क्षेत्र. जागतिकीकरणानंतरच भारताने आर्थिक क्षेत्रात काहीतरी कामगिरी दाखवणे चालू केले. तोपर्यंत भारताला समृद्धी, श्रीमंती म्हणजे काय ते ठाऊक नव्हते आणि याला कारण ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ.’

२. पाश्‍चात्त्यांनी गौरवलेली भारताची प्राचीन अर्थव्यवस्था !

२ अ. प्राचीन भारताच्या सफल अर्थव्यवस्थेविषयी पुराव्यानिशी विचार मांडून बुद्धीवंतांचा भ्रम दूर करणारे सनदी लेखापाल गुरुमूर्ती ! :आता बोलण्याची पाळी एस्. गुरुमूर्ती यांची होती. गोदरेज यांची मते ऐकून गुरुमूर्ती हबकले. भारतातल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च स्तरावरील शैक्षणिक संस्थेच्या लोकांचे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे हे अज्ञान बघून गुरुमूर्ती व्यथित झाले. त्यांनी स्वतःच्या भाषणाच्या लिहून आणलेल्या नोंदी बाजूला ठेवल्या आणि ‘भारताच्या प्राचीन आर्थिक सफलतेविषयी पाश्‍चात्त्य लोकांची काय मते आहेत’, यावरच बोलायचे ठरवले. पुराव्यानिशी, आकडेवारीने सज्ज असलेले त्यांचे भाषण संपले तेव्हा अवाक् झालेले संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणले.

२ आ. गुरुमूर्ती यांच्या भाषणानंतर आयआयटी मुंबईत ‘भारतीय आर्थिक प्रतिमान’ या विषयावर अभ्यासक्रम चालू होणे : गुरुमूर्ती यांनी त्यांच्या भाषणातून, प्राचीन काळी भारत सहस्रो वर्षे जगातील सर्वांत संपन्न आणि समृद्ध देश कसा होता, हे पटवून दिले होते. कार्यक्रम संपल्यावर काही विद्यार्थी गुरुमूर्ती यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, ‘‘मिस्टर गुरुमूर्ती, तुम्ही एवढे सांगून थांबू नका. तुम्ही या संस्थेत ‘भारतीय आर्थिक प्रतिमान’ (इंडियन इकॉनॉमिक मॉडेल) या विषयावर एक अभ्यासक्रम चालू करा.’’ तेव्हापासून गुरुमूर्ती यांचा
२१ तासांचा अभ्यासक्रम आयआयटी मुंबईत चालू आहे.

३. भारताविषयी काडीचाही अभ्यास नसणार्‍या पाश्‍चात्त्यांची मते ग्राह्य धरणारे भारतीय !

३ अ. भारतीर समाजाला ‘अर्धरानटी’ संबोधणारे आणि ब्रिटीश भारतात करत असलेल्या विध्वंसाचे समर्थन करणारे भारतद्वेष्टे कार्ल मार्क्स ! : भारतद्वेष्टे आमचे स्वत:चे भारताविषयीचे मत दुसर्‍यांचे विचार वाचून बनलेले आहे. हे दुर्दैव असले, तरी हेच वास्तव आहे. ज्या विचारवंतांच्या विचारांनी आम्ही प्रभावित झालो आहोत, त्यांनी कधीही भारताला भेट दिलेली नाही, कुणा भारतियाची भेट घेतलेली नाही किंवा कुठले भारतीय साहित्यही वाचलेले नाही. त्यांतील एक आहेत कार्ल मार्क्स. वर्ष १८५७ मध्ये दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी २५ जून १८५३ ला त्यांनी न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्युन या वृत्तपत्रात दोन लेख लिहिले होते. (हे लेख इंटरनेटवर आजही उपलब्ध आहेत) त्यात त्यांनी भारतासंबंधी त्यांची मते मांडली होती. कार्ल मार्क्सने लिहिले, ‘भारत हा एक चमत्कारिक देश आहे. तो देश म्हणून एक आहे, यात शंका नाही. या समाजाची पायाभूत मांडणी (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि गतीक्षमता (मोबिलिटी) राजाकडून नियंत्रित केली जाते. आर्थिक दृष्टीने बघितले तर, या देशातील प्रत्येक खेडे एक स्वतंत्र आर्थिक एकक आहे आणि ते काहीही आयात किंवा निर्यात करत नाही. उत्पादक ग्राहकही आहे आणि ग्राहक उत्पादकही आहे. या देशात आर्थिक असमानता नाही; मार्क्स पुढे लिहितात, ‘असे असले, तरी या समाजात एक फारच घोर दोष आहे. ते गायींची, माकडांची पूजा करतात. असा मागासलेला समाज कधीही प्रगती करू शकणार नाही. मानवाच्या उत्थानासाठी आवश्यक असलेली क्रांती या समाजात घडवायची असेल, तर हा सामाजिक आधार, हा समाज नष्ट होणे आवश्यक आहे. ब्रिटीश हे कार्य करत आहेत. हा विध्वंस वेदनादायी असला, तरी तो सुखावह विध्वंस आहे.’ मार्क्स कधीही भारतात आले नाहीत, त्यांनी कधीही भारतीय साहित्य वाचले नाही, तरीही त्यांनी ‘भारत हा एक अर्धरानटी (सेमी बारबरिक) समाज आहे’, असे मत मांडले. त्याची भारतीय चिंतकांवर आजही घट्ट पकड आहे.

३ आ. कर्म आणि पुनर्जन्म मानणारा भारत कधीही आर्थिक प्रगती करू शकणार नसल्याचे अजब तत्त्वज्ञान मांडणारे मॅकस वेबर ! :दुसरे आहेत मॅक्स वेबर. हे फार प्रसिद्ध नाहीत; परंतु सर्वाधिक प्रभावी सामाजिक चिंतक आहेत. या माणसाने अर्थशास्त्राला सूत्रबद्ध केले आणि ‘सोशिओलॉजी ऑफ इकॉनॉमिक्स’ हा ग्रंथ लिहिला. त्यात ‘प्रोटेस्टंट देश अधिक प्रगती करतात आणि कॅथॉलिक देश मागासलेलेच रहातात’, असा निष्कर्ष त्यांनी मांडला. त्यांचा हा निष्कर्ष खूप गाजला. कार्ल मार्क्स आणि वेबर यांचा भारतीय चिंतकांवर सर्वाधिक प्रभाव आहे. मॅक्स वेबर यांनी हिंदु आणि बौद्ध धर्मावर लिहिलेले पुस्तक वर्ष १९५० मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या मते ‘हे दोन देश म्हणजे भारत आणि चीन कधीही प्रगती करू शकणार नाहीत; कारण ते कर्म आणि पुनर्जन्म यांवर विश्‍वास ठेवतात.’ आम्ही भारताला अशा लोकांच्या चष्म्यातून बघितले आणि तसेच समजू देखील लागलो.

४. आर्थिक इतिहासकार पॉल बैरोक यांचे थक्क करणारे भारताविषयीचे संशोधन !

४ अ. वर्ष १७५० मध्ये भारताचे जीडीपी उत्पन्न २४.५ टक्के ! : वर्ष १९७० मध्ये जपान एक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येऊ लागला, तेव्हा पाश्‍चात्त्य चक्रावून गेले. ‘आर्थिक प्रगती केवळ पाश्‍चात्त्यांचीच मक्तेदारी असतांना हा आशियातील आणि तोही एक बौद्ध देश कसा काय प्रगती करीत आहे ?’, हे त्यांना कळेना. आणि म्हणून पॉल बैरोक (Paul Bairoch) या बेल्जियम देशातील आर्थिक इतिहासकाराने वर्ष १७५० ते वर्ष १९१८ या काळातील विविध देशांच्या आर्थिक विकासाचा तुलनात्मक सखोल अभ्यास केला. त्याचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक असा निघाला. बैरोक यांच्या मते वर्ष १७५० मध्ये जगाची आर्थिक सांख्यिकी (इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स) काढली, तर ती अशी होती : वर्ष १७५० मध्ये चीन जगात क्रमांक एक वर होता आणि जगाच्या एकूण जीडीपीच्या ३३ टक्के त्याचे उत्पन्न होते. जगाच्या जीडीपीच्या २४.५ टक्के उत्पन्नासह भारत दुसर्‍या क्रमांकावर होता.

४ आ. १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप आणि अमेरिका यांच्या राहणीमानाचा स्तर हा आशियाई देशातील राहणीमानाच्या बराच खाली होता ! : त्या काळी ब्रिटनचे उत्पन्न जगाच्या १.८ टक्के, तर अमेरिकेचे केवळ ०.१ टक्का. वर्ष १८०० मध्ये भारताचे उत्पन्न २४.५ टक्क्यांहून २० वर, वर्ष १८३० मध्ये १७ वर, वर्ष १८८० मध्ये ८ वर आणि वर्ष १९०० मध्ये केवळ १.७ टक्क्यांवर आले. केवळ १५० वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राजकारण आणि भारतीय समाज अक्षरश: कोसळला. चीनच्या संदर्भातही हेच घडले. वर्ष १७५० मध्ये जगाच्या ३३ टक्के उत्पन्न असलेला चीन वर्ष १९०० मध्ये ६ टक्क्यांवर घसरला होता. नेमक्या याच काळात म्हणजे वर्ष १७५० मध्ये सुमारे २ टक्के जीडीपी उत्पन्न असणार्‍या ब्रिटन आणि अमेरिका या देशांचे जीडीप उत्पन्न वर्ष १९०० पर्यंत ४१ टक्क्यांवर पोचले. यामुळे एक समग्र परिवर्तन घडले. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक शक्ती आशियाकडून पश्‍चिमेकडे गेली. पॉल बैरोक यांच्या या निष्कर्षाचा एक अर्थ म्हणजे ‘१९ व्या शतकाच्या मध्यात युरोप आणि अमेरिका यांच्या राहणीमानाचा स्तर हा आशियाई देशातील राहणीमानाच्या बराच खाली होता’, असा होता. पश्‍चिमेला प्रचंड धक्का बसला. त्यांना प्रश्‍न पडला, ‘आशिया ही आर्थिक महासत्ता होती, तसेच भारत एक आर्थिक महासत्ता होता’, असे एक पाश्‍चात्त्य संशोधक असे कसे दाखवू शकतो? बरे, पॉल बैरोक हे मान्यवर असे संशोधक होते. त्यामुळे त्यांचा निष्कर्ष एकजात निकालात काढणेही शक्य नव्हते. म्हणून मग ओईसीडी (The Organisation for Economic Co-operation and Development) या संघटनेने पुढाकार घेतला. ओईसीडी ही जगातील ३५ श्रीमंत देशांची संघटना आहे. या संघटनेने अँगस मॅडिसन नावाच्या आर्थिक इतिहासकाराची नियुक्ती केली. ओईसीडीने मॅडिसन यांना सांगितले, ‘पॉल बैरोक यांनी जे निष्कर्ष काढलेत, ते पडताळा आणि ते खरे आहेत कि नाही, याची शहानिशा करा.’ मॅडिसन यांनी जे निष्कर्ष काढलेत तेही वाचण्यासारखे आहेत.
– श्री. श्रीनिवास वैद्य (क्रमश:)

भारतियांनो, प्राचीन भारत हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता, हा इतिहास तुमच्यापासून लपवला गेला, हे जाणा !

आर्थिक इतिहासकार पॉल बैरोक यांच्या मते वर्ष १७५० ची जगाची आर्थिक सांख्यिकी (इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स) काढली, तर ती अशी असेल. वर्ष १७५० मध्ये चीन जगात क्रमांक एक वर होता आणि जगाच्या एकूण जीडीपीच्या ३३ टक्के त्याचे उत्पन्न होते. जगाच्या जीडीपीच्या २४.५ टक्के उत्पन्नासह भारत दुसर्‍या क्रमांकावर होता. ब्रिटनचे उत्पन्न जगाच्या १.८ टक्के, तर अमेरिकेचे फक्त ०.१ टक्का.

ही आकडेवारी म्हणजे ‘भारत हा आर्थिकदृष्ट्या मागसलेला होता’, असा खोटा प्रसार करणारे भारतातील कथित बुद्धीजीवी, पुरोगामी आणि निधर्मी यांना चपराक आहे ! राष्ट्रप्रेमींनो, भारताचा पुन्हा उत्कर्ष साधायचा असेल, तर धर्माधिष्ठित व्यवस्था पुन्हा भारतात प्रचलीत करणे, हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा आणि हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी कटीबद्ध व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *