-
पोलीस-प्रशासन यांची सनबर्नला अद्याप अनुमती नाही
-
सनबर्नच्या आयोजकांकडून मात्र तिकीटविक्री आणि प्रचार चालूच
लवळे येथील कार्यक्रमाच्या अनुमतीसाठी सनबर्न आयोजकांकडून ८ दिवसांपूर्वी आम्हाला अर्ज मिळाला आहे. त्यांच्याकडून अटी-शर्तींची आणि इतर अनुमतींची पूर्तता झाल्यास आम्ही अनुमती देऊ. – श्री. गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, पुणे
सनबर्न फेस्टिव्हलच्या अनुमतीचा प्रस्ताव किंवा अर्ज अद्यापपर्यंत आम्हाला मिळाला नाही. असा प्रस्ताव आल्यास सर्व संबंधित विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच अनुमती देऊ. अनुमती देऊ नये या आशयाचेही निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नाही. – श्री. राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे
पुणे : गोवा राज्यातून हाकलवून लावलेला सनबर्न फेस्टिव्हल आता आपले पाश्चात्त्य विकृतीचे पाय महाराष्ट्रात रोवू पाहत आहे. त्यातच संस्कृतीचे माहेरघर म्हटले जाणार्या पुणे शहरात हा संस्कृतीद्रोही कार्यक्रम घेण्याचा सनबर्न आयोजकांकडून घाट घातला जात आहे. हा फेस्टिव्हल प्रारंभी मोशी येथे घेतला जाणार होता. त्यावेळी मोशी येथील ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन तीव्र विरोध केला आणि त्यामुळे सनबर्नच्या आयोजकांना मोशीतून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर पुणे-नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथेही पुण्याचे विमानतळ प्राधिकरण, वायुदल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्याकडून कार्यक्रमासाठी अनुमती न मिळाल्याने आता सनबर्नने आपला मोर्चा लवळे गावातील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे वळवला आहे. याविषयी सनबर्नच्या फेसबूक खात्यावरही माहिती देण्यात आली आहे. त्यातच बावधन येथील ग्रामस्थांनी ‘हा कार्यक्रम रहित न केल्यास आम्ही कार्यक्रम बंद पाडू’ अशी चेतावणीच दिली आहे. नेहमीप्रमाणे अनुमती मिळण्याआधीच आणि स्थानिकांचा विरोध झुगारून सनबर्नची तिकीटविक्री आणि कार्यक्रमाचा प्रसार चालू आहे. यापूर्वी तेलंगणाचे माजी खासदार व्ही हनुमंत राव यांनी भाग्यनगर येथील सनबर्नच्या आयोजकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती.
प्रशासनाने सनबर्नला अनुमती देऊ नये – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल मध्ये अमली पदार्थांची विक्री करणार्या व्यापार्याला अटक करण्यात आली. या फेस्टिव्हल मध्ये नेहा बहुगुणा या तरुणीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाला. सनबर्नने गोवा शासनाचा करही बुडवला. अशी पार्श्वभूमी पाहता सनबर्नला सांस्कृतिक पुणे शहरात येऊ देणे म्हणजे येथील संस्कृतीवर मोठा घाला आहे. पुणे-नगर येथील रस्त्यावर तर विमानतळ प्राधिकरण आणि वायुदलाने सुरक्षेच्या कारणास्तव सनबर्नला अनुमती नाकारली. या फेस्टिव्हल मुळे जर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर असे फेस्टिव्हल आयोजित करून काय साध्य होणार आहे ? सर्वच परिस्थिती पाहता नागरिकांनाच हा फेस्टिव्हल पुण्यात कुठेच होऊ नये असे वाटते. हिंदु जनजागृती समितीसह सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘सनबर्न पुण्यातच नव्हे तर भारतात कुठे होऊ देणार नाही’ असे आवाहन यापूर्वीच केले आहे. स्थानिक नागरिकांचा सनबर्न विरोधातील रोष प्रशासनाने लक्षात घेऊन सनबर्नला अनुमती देऊ नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात