वेंगुर्ले : शेकडो वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा आज र्हास होत चालला आहे. कुंकू हे सौभाग्याचे लेणे असून, ते लावणेही बंद होत आहे. असे अनेक दुष्परिणाम हिंदु संस्कृतीवर होत आहेत. त्यामुळे हिंदु संस्कृती जपण्याचा संदेश देणारे आणि या संस्कृतीचे पालन केले जावे, असे प्रबोधन करणारे दशावतारी नाटक निर्माण करा. या नाटकाचे नाट्यप्रयोग राज्यभर करून हिंदु संस्कृती आणि दशावतारी नाट्यकला जपण्याचे काम विश्व हिंदु परिषद करील, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हामंत्री रवींद्र तांबोळकर यांनी केले. (कपाळाला कुंकू लावणे यांसारख्या हिंदु धर्मातील शास्त्रशुद्ध रितीरिवाजांविषयीचे धर्मशिक्षण नियमितपणे हिंदूंना देणेही संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
तालुक्यातील खानोली येथील श्री विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी येथे आयोजित केलेल्या दशावतारी नाट्यमहोत्सवाचा समारोप संयुक्त दशावतारी नाट्य कलावंतांच्या नाटकाने झाला. या वेळी नाट्यमहोत्सवातील दादा राणे, सुरेश धुरी, यशवंत चव्हाण-तेंडोलकर, संजय पाटील, महेश गवंडे, मारुति सावंत, नाथा गोसावी, गोसावी बुवा या ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा विश्व हिंदु परिषदेने स्मृतीचषक, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नाट्यमहोत्सवात सहभाग घेतलेल्या सर्व दशावतारी मंडळांना मानधन आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या वेळी श्री विठ्ठल पंचायतन खानोली-सुरंगपाणीचे व्यवस्थापक दादा पंडित, दशावतारी नाटकाचे पुरस्कर्ते दिगंबर नाईक, गोव्यातील उद्योजक तारक आरोलकर, अवधूत स्वार, सरपंच श्यामसुंदर मुणनकर, विश्व हिंदु परिषदेचे दामोदर अभ्यंकर आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात