Menu Close

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

  • नागपूर येथे वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची धरणे आंदोलनाद्वारे शासनाला चेतावणी
  • महाराष्ट्र अंनिसचे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून ट्रस्टवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी

नागपूर – तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत. त्यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने नेमलेली ही समिती विद्यमान भाजप-शिवसेना शासनाने त्वरित विसर्जित करावी. त्याचसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांच्या विरोधात कार्य करत असल्याचा दावा करत देश-विदेशांतून विविध प्रकारे कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला; मात्र त्याचा हिशेब न देता ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे केले आहेत. ते साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्या चौकशी अहवालातूनही उघड झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंनिस ट्रस्टचे विश्‍वस्त मंडळ तात्काळ विसर्जित करून त्यावर प्रशासक नेमण्यात यावा, या मागण्यांसाठी १८ डिसेंबरला नागपूर येथील पटवर्धन मैदानात वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात राष्ट्रीय वारकरी सेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी हातात हस्तफलक घेऊन ‘वारकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारी जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित करा !’, ‘सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून नास्तिकतावादाचे विचार पसरवणारी शासकीय समिती विसर्जित करा !’, ‘शासन आणि जनतेची फसवणूक करणारी महाराष्ट्र अंनिस विसर्जित करा !’, ‘अंनिस म्हणते ‘नका देवाला वंदू’ आणि स्वतः बनली सामाजिक भोंदू, सामाजिक भोंदू !’, अशा उत्स्फूर्तपणे घोषणा देण्यात आल्या.

अंनिसने आता महाराष्ट्रातील जनतेला घोटाळ्यांविषयी जवाब द्यावा ! – श्री. श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

नागपूरमध्ये आज शासनाच्या विरोधात अंनिसवाल्यांचे ‘जवाब दो आंदोलन’ म्हणजे दांभिकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ट्रस्टमधील अनेक घोटाळे पुराव्यांनिशी उघड झालेले आहेत. ट्रस्टमधील घोटाळ्यांची व्याप्ती उघड व्हावी; म्हणून ट्रस्टचे ‘विशेष लेखा परीक्षण’ करण्याची शिफारस सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी शासनाकडे केली आहे. नुकतेच केंद्रीय गृहखात्याने त्यांच्यावर विदेशी निधी घेण्यावर बंदी घालणारी नोटीसही बजावली आहे. त्यामुळे इतरांकडून जवाब न मागता अंनिसनेच आता महाराष्ट्रातील जनतेला घोटाळ्यांविषयी जवाब द्यावा !

सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून नास्तिकतेचे विचार जनतेच्या माथी थोपवले जात आहेत ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, कोकण प्रांताध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी सेना

महाराष्ट्र ही संतांची भूमी असतांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणाविरोधात कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी ‘संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे आहे’, असे विधान केले. अशा प्रकारची विधाने करून ते कोणत्या कायद्याचा प्रचार करत आहेत ? हा कायद्याचा प्रचार नसून वारकर्‍यांच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा अघोरी अन् अनिष्ट प्रकार आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून सरकारी खर्चाने नास्तिकतेचे विचार जनतेच्या माथी लादण्याचे काम सदर शासकीय समिती करत आहे. त्यामुळे ती समिती तात्काळ विसर्जित झाली पाहिजे.

आंदोलनातील घोषणा

१. वारकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणारी जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित करा !

२. गुन्हेगार आणि नक्षलवादी समर्थकांचा भरणा असलेली जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित करा !

३. ‘बुवा तेथे बाया’ असे विधान करून वारकरी संतांचा अवमान करणार्‍या श्याम मानव यांचा धिक्कार असा !

अशा घोषणांमुळे मॉरीश महाविद्यालयाचे पटांगण दणाणून गेले.

क्षणचित्रे

१. आंदोलनात ‘जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित करा आणि श्याम मानव यांचा धिक्कार करा’, अशा आशयाचे फलक हिंदुत्वनिष्ठांच्या हातात झळकत होते.

२. आंदोलनात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये गुजराती समाजातील १५ महिला सहभागी झाल्या होत्या.

नागपूर येथील धरणे आंदोलनात सहभागी मान्यवरांचे विचार

हिंदु जनजागृती समिती देव आणि धर्म यांसाठी कार्य करते, तर अंनिसवाले पैसे कमावण्यासाठी सर्वत्र फिरतात ! – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

अतिशहाणे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांसह त्यांच्या पिलावळीने सतत हिंदु धर्मावर टीका करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करू नये अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल, अशी मी त्यांना चेतावणी देतो. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना असे आंदोलन करत असल्यामुळे आज धर्म टिकलेला आहे. अंनिसच्या माध्यमातून इतर लोकांना भडकवण्याचे काम केले जाते. एकीकडे हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतांना अंनिससारखी संघटना त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचे काम करत आहे. ते त्यांनी करू नये. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि वारकरी संप्रदाय सत्तेसाठी नव्हे, तर धर्मासाठी सतत धावपळ करून विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आम्हाला विविध मागण्यांचे निवेदन देत असतात, तर दुसरीकडे अंनिसमधील ‘बदमाश’ लोक पैशांसाठी इतर ठिकाणी फिरत असतात. हिंदु जनजागृती समिती ही एकमेव अशी संघटना आहे की, ती धर्म टिकवण्यासाठी काम करत असल्याने शासनाला सतत जागे करत असते. त्या संघटनेला मी मनापासून धन्यवाद देतो. देव, धर्म वाचवण्याचे काम करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. तसेच लक्षावधी रुपये लाटणारी जादूटोणाविरोधी शासकीय समिती विसर्जित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.

अंनिसमध्ये घोटाळा करणार्‍या दोषींवर कारवाई होण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू ! – आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना

जादूटोणाविरोधी शासकीय समिती विसर्जित झालीच पाहिजे. देवता आणि संत यांविषयी हिंदूंमध्ये आस्था (श्रद्धा) असते; मात्र अंनिस संघटना अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेवर आक्रमण करण्याचे काम करते. त्यामुळे जादूटोणाविरोधी शासकीय समिती विसर्जित करून संबंधित दोषींवर गुन्हे प्रविष्ट केले पाहिजेत. अंनिसमध्ये घोटाळा, भ्रष्टाचार झाला असल्याने अंनिस संघटनेमधील सदस्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवले पाहिजेत. याविषयी मी विधानसभेत आवाज उठवीन. येथून पुढे अंनिसकडून होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. हा लढा देण्यासाठी सर्वांनी असेच संघटित व्हावे. हिंदु जनजागृती समिती हिंदु समाजाला संघटित करून धर्म टिकवण्याचे काम करत आहे. आम्ही बाहेर असलो, तरी ही संघटना आमच्या संपर्कात असते.

शहर आणि ग्रामीण भागात कुठेही हिंदूंवर अत्याचार अथवा अन्याय झाल्यास ही संघटना हिंदूंच्या संरक्षणाची शासनाकडे त्वरित मागणी करते, तसेच मीही हिंदुत्वनिष्ठांना कुठेही अडचण आल्यास त्वरित सहकार्य करीन.

श्याम मानव हे चांगले कार्य करतील, असे वाटले होते; मात्र जादूटोणाविरोधी कायद्याच्या आड सनातन धर्माला नष्ट करायला ते निघाले आहेत. ज्याप्रमाणे रावणाच्या लंकेवर हनुमानाने चढाई केली होती, त्याचप्रमाणे या अनिष्टांवर आपण विजय प्राप्त करू. वारकर्‍यांवरील अन्याय दूर करण्यासाठी समितीचे जे आंदोलन चालू आहे, ते अती विशाल रूप धारण करणार आहे. देवीस्वरूप माता भगिनी सनातन धर्म रक्षणासाठी संघटित झाल्या आहेत. ‘मॅकॉले’ शिक्षण पद्धतीने रसातळाला गेलेल्या समाजात गुरुकुल पद्धतीने चालणारे शिक्षणच आदर्श राष्ट्र घडवेल.

– प्रा. बंडूजी कांबळे, योग वेदांत सेवा समिती, नागपूर

सर्वत्रच्या सर्व संघटनांच्या स्वाक्षर्‍या घेऊन त्याचे निवेदन शासनाला देऊन शासनावर दबाव वाढवू शकतो. अंनिसने ‘कुंभमेळा म्हणजे वेस्ट ऑफ मनी’ असे हीन प्रकारे संबोधणे चुकीचे असून अशा प्रकारे हिंदु धर्माला सतत विरोध केला आहे. तेच आता श्याम मानव करत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन श्याम मानव यांच्या समितीला प्रखर विरोध केला पाहिजे.

– श्री. प्रदीप देशपांडे, योग वेदांत सेवा समिती, नागपूर

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *