पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी
पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सनबर्न रहित करावा !
हिंदूंना अशी मागणी करावी लागण्यापेक्षा सरकारने स्वतःहूनच अशा पाश्चात्त्य विकृतींना कायमचा पायबंद घातला पाहिजे !
पुणे – पाश्चात्त्य विकृती असलेल्या सनबर्नकडून शासनाला महसूल मिळतो; म्हणून सनबर्नला अनुमती देणार्यांचा आम्ही निषेध करतो. हिंदूंच्या सण-उत्सवातून महसूल मिळत नाही; म्हणून आमच्यावर गुन्हे प्रविष्ट केले जातात का ? गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवांमध्ये आवाजाचे निर्बंध घातले जातात, तसे निर्बंध सनबर्नला घालण्यात आले का ? हिंदूंच्या सण-उत्सवांवर बंधने घालणार्यांनी पाश्चात्त्य सनबर्नला अनुमती देऊ नये. या प्रकरणी आता पालकमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करून हा कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी अधिवक्ता राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. ‘सनबर्नला पोलिसांनी अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणीही देण्यात आली.