मुंबई : शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यासह त्यांच्या ३ सहकार्यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी पुण्यातील येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अजिजुद्दीन जहिरुद्दीन शेख उपाख्य सत्तार याला सर्व प्रकारच्या माफीच्या कालावधीसह ६० वर्षांपर्यंतची शिक्षा भोगावी लागणार आहे. मुदतपूर्व मुक्ततेविषयी राज्य सरकारने विशेषाधिकाराचा वापर करून निर्णय घेतल्यानंतर नुकताच याविषयीचा आदेश काढला.
४ मार्च १९९९ या दिवशी रात्री माजी महापौर वैद्य माहीम येथील निवासस्थानी ६ जणांसह चर्चा करत होते. त्या वेळी अजिजुद्दीन आणि त्याचे सहकारी यांनी ‘एके-४७’ बंदुकीतून त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता, तर वैद्य आणि अन्य तिघे गंभीर घायाळ झाले होते. सत्र न्यायालयाने जलद गतीने खटला संपवून अजिजुद्दीनला फाशीची शिक्षा ठोठावली होती. अजिजुद्दीनने अन्य दोषींसह शिक्षेच्या विरोधात अपील केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अजिजुद्दीनची फाशीची शिक्षा रहित करून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते. (१८ वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची शिक्षा निश्चित होण्यासाठीच एवढा मोठा कालावधी लागणार असेल, तर गुन्ह्यांचे प्रमाण अल्प करण्यासाठी किती कालावधी लागेल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात