विश्व हिंदु संमेलनामध्ये हिंदूंना स्वसंरक्षणार्थ घरामध्ये शस्त्र ठेवण्याचे आवाहन केल्याचा आरोप
भाग्यनगर : येथील गोशामल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह, श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालीक, श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्यप्रमुख सिद्धलिंग स्वामी आणि भाग्यनगर-कर्नाटक प्रमुख श्री. विजय पाटील यांच्या विरोधात कर्नाटकातील यडगिरी पोलीस ठाण्यात भडकावू भाषण करून दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यडगिरी येथे श्रीराम सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदु संमेलनामध्ये टी. राजा सिंह यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचे आवाहन केले होते. कर्नाटकचे उत्तर-पूर्व भागाचे पोलीस महानिरीक्षक आलोक कुमार म्हणाले की, आम्ही या भाषणाच्या विरोधात स्यू मोटो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अवैधरित्या लोकांना गोळा करणे, शस्त्रांचे प्रदर्शन करणे आणि दोन धर्मांत तेढ निर्माण करणारी विधाने करणारे यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
टी. राजा सिंह यांच्या भाषणातील काही सूत्रे
१. प्रत्येक हिंदूने घरात शस्त्र ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणे आवश्यक आहे आणि तेव्हाच अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते. जर तुमच्या घरी शस्त्र नसेल, तर तुम्ही देशाचे तर नाहीच, तुमचे आणि तुमच्या परिवाराचेही संरक्षण करू शकत नाही.
२. जो कोणी अखंड हिंदु राष्ट्राच्या मध्ये येईल, त्याचे अस्तित्व नष्ट होईल. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, अखंड हिंदु राष्ट्र स्थापन होईल; मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागेल. तलवार आणि अनेक प्रकारच्या विद्या शिकाव्या लागतील. हे आपल्याला देशाच्या रक्षणासाठी शिकावे लागणार आहे.
मी काही चुकीचे बोललेलो नाही !
भाषणातील या सूत्रांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांविषयी टी. राजा सिंह म्हणाले की, मी काही चुकीचे म्हटलेले नाही. ते माझे वैयक्तिक मत आहे आणि त्याचा पक्षाच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही.
काँग्रेसची टीका
काँग्रेसचे प्रवक्ता बृजेश कलप्पा यांनी टी. राजा सिंह यांच्या विधानावरून भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजप काही अशाच लोकांना जाणीवपूर्वक पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्यांचा राजकारणाचाच भाग आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात