Menu Close

सभ्यतेचे मूळ संस्कारांमध्ये !

सभ्यता, जी इंग्रजीमधून ‘मॅनर्स’ या नावाने परिचित आहे, ‘ती शिक्षणामुळे अथवा अनुभवामुळे येते’, असा एक अपसमज आहे. ‘खेड्यांमध्ये सभ्यतेची वानवा असते आणि शहरी लोक सभ्य असतात’, अशीही एक चुकीची समजूत आहे. मेकॉले शिक्षणपद्धत, चित्रपट, भारतीय संस्कृतीविषयी न्यूनपणाची भावना किंवा पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण यांमुळे कदाचित हा अपसमज घट्ट झाला असावा; पण आजूबाजूला विशेषतः लोकशाहीचे मंदिर वगैरे समजले जाणारी संसद, विधीमंडळ सभागृह अथवा महापालिका सभागृह आदी ठिकाणी सदस्यांची वर्तणूक पाहिली की, सभ्यतेविषयीच्या प्रचलित समजुतींना सहजतेने छेद जातो. ‘छेद जातो म्हणण्यापेक्षा भगदाड पडते’, असे म्हणणे अधिक योग्य होईल.

नुकतेच पुणे महानगरपालिकेमध्ये सायकल शेअरिंगच्या प्रस्तावाच्या संदर्भात बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या समोरील राजदंड पळवून बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला, तर ३ नगरसेवक चक्क सायकली घेऊनच सभागृहात आले आणि त्यांनी सभागृहातच समोरच्या बाजूला सायकली लावल्या. सध्या चालू असणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्येही आमदार पदावरील व्यक्ती कशा वर्तणूक करत आहेत, हे जनता पहात आहे. एखाद्या शाळेत विद्यार्थी गोंधळ घालत असतील आणि शिक्षकाचे ऐकत नसतील, तर विशिष्ट प्रकारची शिक्षा केली जाते. हे नियम आमदार, नगरसेवक यांना लागू करायचे म्हटले, तर ..?

एखाद्या सभेमध्ये अथवा बैठकीमध्ये कसे बोलावे, कसे वागावे, आपले मत विरोधात असेल, तर ते कसे मांडावे, बैठकीचे स्वरूप कसे असावे, बैठक घेणार्‍याचा दृष्टीकोन कसा असावा, याचे काही नियम आहेत. हा एक प्रकारचा शिष्टाचार आहे; मात्र तो संस्था, सरकारी कार्यालये यांठिकाणी अपवादानेच पहायला मिळतो. याउलट व्यक्ती सुसंस्कारित असली आणि अंगी सद्गुण भिनलेले असतील, तर व्यक्तीचे सर्व वर्तनच आदर्श होते. यावरून शिक्षण, लोकप्रियता अथवा यश यांमुळे सभ्यपणा येत नाही, हेच अधोरेखित होते. सभ्यतेचे मूळ संस्कारांमध्ये आहे. संस्कार आणि साधना असेल, तर व्यक्तीचे निर्णय, तसेच वर्तणूक योग्य आणि परिपूर्णतेच्या दिशेने जाणारी असते. सुसंस्कार आणि साधनेचे बळ आवश्यक आहे, ते यासाठीच ! तिकडे लक्ष दिले, तर कसे वागावे, कसे बोलावे हे शिकण्यासाठी निराळ्या ‘सॉफ्ट स्किल्स’च्या तासांना बसायची आवश्यकता पडणार नाही !

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *