‘मध्यंतरी जावेद अख्तर (चित्रपट निर्माता) मोठ्या गर्वाने सांगत होते की, ते नास्तिक आहेत. ते सांगत होते की, तरुण वयात ते नास्तिक झाले होते. ते अल्लाहला मानत नाहीत, रोजा ठेवत नाहीत, मशिदीत कधी गेले नाहीत किंवा नमाज पढला नाही इत्यादी. ते संपूर्ण नास्तिक ! मी जेव्हा त्यांचा ‘दिवार’ चित्रपट पाहिला, तेव्हा मला संभ्रम निर्माण झाला की, हे नास्तिक खोटे तर बोलत नाहीत ना ?
१. ‘दिवार’ चित्रपटात नायक हिंदूंच्या देवतांवर नाराज असल्याचे चित्रण
‘दिवार’मध्ये दाखवले आहे की, वर्मा यांचा मुलगा विजय (अमिताभ बच्चन) लहानपणीच देवावर नाराज होतो. त्यामुळे मंदिरात जात नाही. त्याची आई सुमित्रा (निरुपमा रॉय) हिने सांगूनही तो कधी मंदिराची पायरी चढत नाही. त्याच्या आईने आग्रह केल्यावर मंदिराचा पुजारी आईला सांगतो, ‘‘देवाची पूजा बळजोरी करून होत नाही, तर त्यासाठी श्रद्धा आवश्यक असते. त्याच्या मनात श्रद्धा निर्माण होईल, तेव्हा तो स्वतःहून मंदिरात येईल.’’ वा ! किती छान दृष्टीकोन दिला पुजार्याने ! हे मंदिर होते आणि समोर पुजारी होता; म्हणून ठीक आहे. याच जागी मशीद असती आणि समोर मौलवी असता, तर विजयने अल्लाहचा अपमान केल्याचा फतवा निघाला असता.
२. नास्तिक असलेल्या नायकाची बिस्मिल्लाहवर श्रद्धा बसणे
एकंदर असे आहे की, संपूर्ण चित्रपटात नायकाचे देवाशी वैर आहे. जणूकाही तो नास्तिकच झाला आहे; परंतु जेव्हा बंदरावर काम करणारे रहिमचाचा त्याला भेटतात, तेव्हा वेगळीच स्थिती आहे. रहिमचाचा विजयच्या दंडावर बांधलेल्या ७८६ नंबरच्या बिल्ल्यासंदर्भात माहिती देतात, ‘‘बाळा, आमच्यात ७८६ चा अर्थ आहे बिस्मिलाह ! हा आमच्यात अत्यंत पवित्र मानला जातो. जेव्हा कुणीतरी गोळी मारतो, तेव्हा गोळी ज्याच्यावर झाडली आहे, तो या बिल्ल्यामुळे वाचतो.’’ त्यामुळे त्याचा बिल्ल्यावरील विश्वास दृढ होतो. तो पूर्ण चित्रपटात वेळोवेळी त्या बिल्ल्याचे चुंबन घेऊन हृदयाजवळ ठेवतो. एका नास्तिकाचा बिस्मिल्लाहवर विश्वास आहे; पण भगवंतावर नाही !!
३. अडचण आल्यावर त्याचे खापर देवावर फोडण्यासाठी नास्तिक नायकाने मंदिराची पायरी चढणे
सगळ्यात मोठी विस्मयाची गोष्ट अशी की, नायकाची आई पुष्कळ आजारी असते. ती मृत्यूशी झुंज देत असते. तेव्हा विजयला मंदिराची आठवण होते आणि अल्लाहमिया फ्रेममधून गायब होतात. मंदिराच्या पायर्या चढत चढत आलेला विजय देवासमोर उभा राहून म्हणतो की, मी आजतागायत तुझ्या पायर्या चढलो नाही. मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितले नाही इत्यादी इत्यादी.
आता कोणीतरी विचारणे आवश्यक वाटते की, आता का देवाकडे आलास बाबा ? आधी काही मागितले नाही, तर मग आता तरी का मागतोस ? हा तर नास्तिक आहे. आयुष्यात मंदिराच्या पायर्या चढला नाही; पण बिस्मिल्लाहचे (७८६चे) दहा वेळा चुंबन घेत त्याला छातीशी कवटाळत बसला आणि काही चुकीचे घडले की, त्याचे खापर मात्र देवावर फोडून देवाला दोष देत बसणार.
४. हिंदूंच्या देवतांना न मानणार्या चित्रपटातील नायकांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी आदर !
जावेद अख्तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पहिल्यापासून नास्तिक आहेत; पण जेव्हा चित्रपटाची कथा लिहिण्याचा भाग येतो, तेव्हा त्यांचा कल इस्लामच्या बाजूने झुकलेला दिसतो. त्यांच्या कथेतील नायक निरिश्वरवादी आहे. तो हिंदूंच्या देवतांना मानत नाही; पण अल्लाह आणि ७८६ ला मनापासून मानतो, हा कसला निरीश्वरवाद ? हे कसे झाले आहे की, उमर खालिदची बहीण म्हणतेे, ‘तिचा भाऊ इस्लामवर विश्वास ठेवत नाही’; पण तो जेएन्यू (JNU) मध्ये ‘इन्शा अल्लाह, इन्शा अल्लाह’च्या घोषणा देतो. तो स्वतःच्या समूदायाला पूर्णपणे समर्पित असून प्रत्येक मुसलमानाप्रमाणे दुसर्या मुसलमानाप्रती (महंमद अफजलप्रती) संपूर्ण एकनिष्ठ आहे ! माझे वडील सांगत होते की, या चित्रपटाच्या प्रभावाने त्या वेळच्या तरुण पिढीतील बहुतेक मुले स्वतःला अमिताभ बच्चन समजून देवावर रागावून मंदिराच्या पायर्यांवर बसत असत. ७८६ चा बिल्ला आणि पदक जत्रेतील दुकानातून खरेदी करून स्वतःच्या निळ्या शर्टाच्या वरच्या खिशात, जो हृदयाच्या जवळ असतो, त्यात ऐटीत ठेवत असत.
चित्रपट पहातांना लक्षात येते की, बहुतेक चित्रपटांमध्ये हिंदु नायकाचा देवावर विश्वास नसतो. तो मंदिरात जात नाही. प्रसाद खात नाही. याउलट मुसलमान किंवा ख्रिस्ती नायक अल्लाह किंवा गॉडच्या विरोधात गेलेला अथवा मशिदीच्या पायर्यांवर बसलेला दिसून आला नाही. तो ‘धर्माच्या विरोधात गेला’, असे कधीही दाखवण्यात आलेले नाही; पण त्यांच्या धर्माप्रती प्रचंड निष्ठावान दाखवला गेला आहे. अडचण केवळ हिंदूंच्या देवता संदर्भातच आहे ! अशाच चित्रपटांच्या प्रभावामुळे मी आजच्या हिंदु-तरुण पिढीला मंदिरांच्या पायरीवर देवावर रुसून बसलेले पाहिले आहे.
५. पुरोगाम्यांकडून हिंदूंचे सण ही कट्टरता, तर अन्य पंथियांचे सण ही धार्मिकता मानली जाणे
नास्तिक होणे तर आजकाल एक ‘फॅशन’ झाली आहे. मला चित्रपटातील नास्तिक आणि जेएन्यूछाप नास्तिक यांमध्ये एकच समानता दिसून येते, ती म्हणजे त्यांना हिंदूंच्या देवी-देवतांविषयी राग आहे; पण इतर कोणत्याही पंथांच्या श्रद्धास्थानांविषयी नाही. त्यांच्या मते, दुर्गादेवी हिंदूंची एक कल्पना आहे. याउलट महिषासुराची पूजा करणे त्याला मानणे म्हणजे आधुनिकता आणि सत्य आहे. ‘राम राम’ म्हणणे ही कट्टरता आहे आणि ‘इन्शा अल्लाह, इन्शा अल्लाह’, असे ओरडणे ही धार्मिकता आहे. दिवाळी किंवा होळी साजरी करणे म्हणजे बुरसटलेल्या-मागास कल्पनांचे प्रतीक आहे; परंतु ईद आणि ख्रिसमस साजरा करणे म्हणजे साम्यवादी असण्याचे लक्षण आहे. जेएन्युमधील साम्यवादी लोकांचे म्हणणे आहे की, धर्म ही अफूची गोळी आहे. ते इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांना रसगुल्ल्याची उपमा देतात, तर हिंदुत्वाला अफू, गांजा, चरस इत्यादी मादक पदार्थांची उपमा देतात.
६. नास्तिक असण्याचा अर्थ ‘हिंदुद्वेषी असणे’, असा झाला आहे !
मी जगात अनेक प्रकारचे नास्तिक पाहिले आहेत. ज्यांच्यासाठी सर्व धर्म समान असतात. ते जितक्या प्रामाणिकपणे दुसर्या धर्मातील त्रुटी दाखवतात, त्यापेक्षा अधिक प्रामाणिकपणे स्वतःच्या धर्माच्या चिंधड्या उडवतात. जेएन्युमधील विचारवंत होण्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. जेएन्युमधील विचारवंत हे दिवार चित्रपटातील नायकासारखे असतात. देवावर रुसून मंदिरात न जाता पायर्यांवर बसून रहातील; परंतु ७८६ क्रमांकाच्या बिल्ल्याचे भक्तीभावाने चुंबन घेतील. तसे पहाता संपूर्ण देशात नास्तिक असण्याचा अर्थ हिंदुद्वेषी असणे झाला आहे. हिंदु धर्म समस्त नास्तिकांच्या सरावासाठी ‘पंचिंग बॅग’ झाला आहे.’
(आशिष छारी यांच्या फेसबूक पोस्टवरून साभार)
– श्री. सुरेश चिपळूणकर, प्रखर राष्ट्रवादी, उज्जैन, मध्यप्रदेश.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात