Menu Close

महाराष्ट्र राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करा – शिवसेना, भाजप आणि मनसे आमदारांची मागणी

धर्मांतरबंदी कायद्यासाठी आमदारांचे विधानभवनात आंदोलन

  • लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणींची होणारी दुर्दशा पाहून सरकारने धर्मांतरबंदी कायदा अगोदरच लागू करणे आवश्यक होते ! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र सरकारने संपूर्ण भारतात हा कायदा लागू करणे आवश्यक आहे !
  • शिवसेना, भाजप आणि मनसे आमदारांचे हिंदु जनजागृती समितीकडून आभार !
विधानभवनाच्या पायर्‍यांवर चेतावणी देतांना आमदार

नागपूर – नुकतच वांद्रे (मुंबई) येथील हिंदु मॉडेल रश्मी शहाबाजकर यांना त्यांच्या मुसलमान नवर्‍याने धर्मांतर करण्यासाठी बेदम मारहाण केली. रश्मी यांनी इस्लाम पंथात धर्मांतर न केल्यामुळे पतीने त्यांना तलाक देऊन दुसरा विवाहही केला. अशा प्रकारे प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून महिलांचे धर्मांतर करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या संदर्भात आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांविषयी तत्कालीन काँग्रेस शासनाने न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समिती नेमली होती. या समितीने मध्यप्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र शासनाला केली होती. ती शिफारस स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्या आमदारांनी २० डिसेंबरला विधानभवनाच्या पायर्‍यावर आंदोलन करतांना दिली.

शिवसेना, भाजप आणि मनसे आमदारांचे हिंदु जनजागृती समितीकडून आभार !

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा व्हावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजप आणि शिवसेना पक्षांतील अनेक आमदार अन् मंत्री यांना भेटून निवेदन देण्यात आले होते. या निवेदनासमवेत धर्मांतराचे विविध पुरावे आणि माहितीही जोडून देण्यात आली होती. याची नोंद घेत २० डिसेंबरला शिवसेना, भाजप आणि मनसे या पक्षांतील आमदारांनी आंदोलन केले. याविषयी हिंदु जनजागृती समितीने या पक्षांतील आमदारांचे आभार मानले आहेत. हा कायदा लागू होईपर्यंत हा विषय उचलून धरावा, अशी विनंती समितीच्या वतीने या आमदारांना करण्यात आली आहे.  विधीमंडळात हा कायदा लागू करण्याची मागणी करणार आहोत, असेही आमदारांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले म्हणाले की,

मुंबईसह महाराष्ट्रभरात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मुंबई येथील डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडशेन संस्थेच्या कल्याण येथून अटक केलेल्या रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या कार्यकर्त्यांनी अनुमाने ८०० जणांना फसवून अन् प्रलोभन देऊन धर्मांतर केले होते. या धर्मांतरितांना आयएस्आयएस् (इसिस) या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेत भरती करण्याचे त्यांचे षड्यंत्र होते, असा संशय आहे. तसेच महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागांत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात त्वरित धर्मांतरबंदी कायदा लागू झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

विविध वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांची शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी दिलेली सडेतोड उत्तरे पुढीलप्रमाणे

१. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतांना तुम्हाला धर्मांतर बंदीची मागणी का करावी लागते ?

उत्तर – आम्ही प्रतिवर्षी धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करून शासनाला लक्षात आणून देत आहोत. जोपर्यंत धर्मांतरबंदी कायदा होत नाही, तोपर्यंत ही मागणी करतच राहू. तसेच ही मागणी आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेतही करून हा कायदा करूच.

२. तुम्ही आताच धर्मांतरबंदी कायद्याची मागणी का करत आहात ?

उत्तर – मुंबई येथे नुकतेच धर्मांतर करण्यासाठी हिंदु मॉडेल रश्मी शहाबाजकर यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. हिंदूंना प्रलोभने दाखवून बलपूर्वक धर्मांतर करण्यात येत आहे. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने ७०० ते ८०० हिंदूंचे धर्मांतर केल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात उघड झाले आहे. यासाठी आम्ही धर्मांतरबंदीची मागणी करत आहोत. तसेच राज्यातील आदिवासी पाड्यांत शिक्षण, शाळा, पैसा अशी आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणात त्यांचे धर्मांतर केले जात आहे. त्याला आमचा प्रखर विरोध आहे.

३. तुमचे गृहराज्यमंत्री धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई का करत नाहीत ?

उत्तर – धर्मांतर केल्याची तक्रार आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करता येते; मात्र धर्मांतर केलेल्या अनेक लोकांना फसवून धर्मांतर करण्यात येते. त्यामुळे हे लोक भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. यासाठी धर्मांतरबंदीचा कायदा करणे आवश्यक आहे.

४. हिंदु धर्मात दलितांचा छळ केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केले होते. मग तुम्ही आता या कायद्याची मागणी का करता ?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केले, तेव्हा त्या वेळी वेगळी परिस्थिती होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदूंना फसवून, त्यांना आमिषे दाखवून, प्रसंगी मारहाण करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. कुणी स्वच्छेने धर्मांतर करत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही.

५. धर्मांतर केल्याच्या किती तक्रारी तुमच्याकडे आल्या आहेत ? आकडेवारी आहे का ?

उत्तर – राज्यात अनेक ठिकाणी उघडपणे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. अनेक हिंदु संत, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील श्री संप्रदायाचे जगद्गुरु नरेंद्र महाराज यांनी धर्मांतर केलेल्या लक्षावधी लोकांचे शुद्धीकरण करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करून दिला आहे. ही संख्या मोठी असतांना वेगळ्या आकडेवारीची आवश्यकता नाही.

६. तुमचे गृहराज्यमंत्री ग्रामीण विभागाचे असतांना ग्रामीण भागातील धर्मांतराच्या घटनांवर का कारवाई करत नाही ?

उत्तर – गृहखात्याकडे आलेल्या धर्मांतराच्या तक्रारीची गृहराज्यमंत्री नोंद घेतातच; मात्र  सर्वच हिंदू धर्मांतराची तक्रार करतात, असे होत नाही. ही समस्या गंभीर आहे. त्यामुळे धर्मांतरबंदीचा कायदा करणे आवश्यक आहे.

आंदोलनाच्या वेळी दिलेल्या घोषणा

गोरगरिबांना फसवणार्‍यांच्या विरोधात कायदा झालाच पाहिजे !, धर्मांतरबंदी कायदा त्वरित करा !, अशा आमदारांनी दिलेल्या घोषणांमुळे विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.

आंदोलनात सहभागी आमदार

शिवसेनेचे आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, मंगेश कुडाळकर, रूपेश म्हात्रे, सुभाष साबणे, राजन साळवी, राहुल पाटील, गौतम चाबुकस्वार, अशोक पाटील, भाजपचे आमदार श्री. महेश चौगुले आणि मनसेचे श्री. शरद सोनावणे

या वेळी शिवसेनेचे नेते आणि सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *