पुणे – महाराष्ट्रामध्ये श्री गणेशाची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी श्री गणेशपूजेला प्रोत्साहन दिले; मात्र सध्या अनेक ठिकाणी सण शास्त्रीय अनुष्ठानानुसार साजरे होत नाहीत. दीपावलीमध्ये वाढणार्या प्रदूषणाने वातावरण मलिन होत आहे. शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी सज्जनांची संघटनशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. ईश्वर, धर्म आणि संघटनशक्ती हेच अस्तित्वरक्षणाचे योग्य मार्ग आहेत, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती न्यासाच्या वतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा आणि आशीर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त उपस्थित होते.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती पुढे म्हणाले, ‘‘कलियुगात विनायकाची आणि चंडीची पूजा होणे आवश्यक आहे. आजच्या महायांत्रिक युगात वैदिक शास्त्राचा आधार न घेता देशात आणि देशाबाहेर जे पंतप्रधान अन् राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांचे सर्व प्रयोग व्यर्थ आहेत. आधुनिक वैज्ञानिक प्रयोगांना शास्त्रसंगती असणे अत्यंत आवश्यक आहे.’’
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात