आंध्रप्रदेशमधील तेलगू देसम् सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर भाजपचे सरकार असलेल्या राज्यांत तो का घेतला जात नाही ?
विजयवाडा – ख्रिस्ती नववर्ष मंदिरांमध्ये साजरे करू नये; कारण हा हिंदु संस्कृतीचा भाग नाही. यासाठी मंदिरांनी कोणताही खर्च करू नये. हिंदु संस्कृतीनुसार उगादी हे तेलुगु जनतेचे नवीन वर्ष असतेे आणि या दिवशी त्यांनी मंदिरांमध्ये पूजा केली पाहिजे, कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व मंदिरांना दिला आहे.
आंध्रप्रदेश सरकारच्या निधी विभागाचा भाग असणार्या हिंदु धर्म परिरक्षण ट्रस्ट (एच्डीपीटी)ने एका अधिसूचनेमध्ये हे म्हटले आहे. या ट्रस्टचे सचिव विजय राघवाचार्युलु म्हणाले, पाश्चात्त्य नववर्ष एका कार्यक्रमापर्यंतच सीमित आहे; मात्र उगादी हे नववर्ष वातावरणात होणारा पालट आणि पालटणारी पंचांगांची स्थिती दर्शवतो. मंदिरांमध्ये ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी मंदिरांकडून खर्च केला जातो. तो त्यांनी करू नये, असे या अधिसूचनेत म्हटले आहे आणि ती अधिसूचना सर्व मंदिरांना पाठवण्यात आली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात