बेंगळुरू : येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. रोहित चक्रतीर्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे श्री. दिवाकर भट आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते. या हिंदु अधिवेशनात ६७ धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार केला.
हिंदुविरोधी शक्तींना सनदशीर मार्गाने सामोरे जाणे आवश्यक ! – रोहित चक्रतीर्थ
भटकळ येथे आमदार चित्तांजन यांची हत्या होऊन २५ वर्षे उलटली, तरी अजून या प्रकरणी चौकशी झालेली नाही. उत्तरप्रदेशमध्ये अखलाकची जेव्हा हत्या झाली, तेव्हा पुरोगाम्यांनी आकांडतांडव केले; मात्र परेश मेस्त यांची हत्या झाल्यानंतर ही मंडळी गप्प राहिली. या पुरोगाम्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देणे आवश्यक आहे.
हिंदु संघटकांमध्ये समर्पित वृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक ! – दिवाकर भट
हिंदु संघटकांमध्ये धर्माप्रती समर्पित वृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र येणारच आहे, अशी ठाम श्रद्धा ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत राहिले पाहिजेे.
मंदिरे, शक्तिपीठे ही सरकारची नसून हिंदूंची आहेत ! – वेदब्रह्मर्षि डॉ. उमेश शर्मा गुरुजी
उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात अभिषेक करण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. अमरनाथमध्ये घंटानाद, वेदघोष यांवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील ३५ सहस्रांहून अधिक मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. हिंदूंनी कायदेशीर साहाय्य घेण्याचा प्रयत्न केल्यास पर्यावरणाच्या नावाखाली त्यांना न्याय मिळत नाही. मंदिरे, शक्तिपीठे ही सरकारची नसून हिंदूंची आहेत.
हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी वैध मार्गाने लढा द्या ! – अधिवक्ता प्रसन्ना
बेंगळुरूमध्ये अनेक पशूवधगृहे आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जात आहे. आपण संघटितपणे त्या विरोधात लढा उभारला पाहिजे.
हिंदूंनी सावध होऊन धर्मरक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक ! – डॉ. चिदानंद मूर्ती
मुसलमान मौलवी प्रत्येकाला मुसलमान करू पहातात, तर ख्रिस्ती मिशनरी प्रत्येकाला ख्रिस्ती बनवू पहातात. धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या दिवसेंदिवस अल्प होत चालली आहे. हिंदूंनी वेळीच सावध होऊन धर्मरक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे.
या वेळी श्री. देवेंद्र जैन, श्री. पद्मनाभ होळ्ळा, श्री. उमाशंकर इत्यादी अधिवक्त्यांनी कायद्याची माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता मोहन गौडा, श्री. काशीनाथ प्रभु, रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनीही त्यांचे विचार मांडले.
क्षणचित्रे
१. १५ धर्माभिमान्यांनी ३१ डिसेंबरच्या निषेधमोर्च्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
२. ११ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
३. ५ धर्मजागृती सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
४. माहिती अधिकार कायद्याविषयी शिबीर घेण्याचे ठरले.
५. ६ प्रथमोपचार शिबिरे घेण्याचे ठरले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात