इस्लामाबाद : हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकच्या कारागृहात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी इस्लामाबाद येथील पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली. या वेळी कारागृहातील कैद्याप्रमाणे कुलभूषण जाधव आणि त्यांची आई अन् पत्नी यांच्यामध्ये काचेची भिंत होती. त्यांच्यात अंतर ठेवण्यात आले होते. या वेळी भारताचे पाकमधील उप उच्चायुक्त जे.पी. सिंह यांना हे संभाषण काचेतून पाहण्याची मुभा देण्यात आली होती. या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी लगेचच विमानाने भारताकडे रवाना झाले. या भेटीनंतर पाकने एक चित्रफीत प्रसारित केली आहे. यात कुलभूषण जाधव हे भेट घडवून आणल्यासाठी पाकचे आभार मानत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या भेटीवरून पाकने जगाला आपण कशाप्रकारे माणुसकी दाखवून कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ दिली, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सातत्याने या भेटीविषयीची माहिती आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली जात होती. (डावपेचात भारतापेक्षा हुशार असणारा पाक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात