भारताकडून निषेध !
-
भेटीपूर्वी आई आणि पत्नी यांना कपडे पालटायला लावले !
-
मातृभाषा मराठीतून संवाद साधण्यास बंदी !
-
कर्णफुले, टिकली, बांगड्या आणि मंगळसूत्रही काढून घेतले !
पाकचा भारतद्वेष ! पाकचा केवळ निषेध न करता त्याला अद्दल घडवण्यासाठी सरकार आतातरी पावले उचलणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कह्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकमध्ये भेटायला गेलेली त्यांची आई आणि पत्नी यांना पाकने अत्यंत हीन अन् अपमानास्पद वागणूक दिल्याचे उघड झाले आहे. जाधव यांच्या भेटीपूर्वी पाकने त्यांची आई आणि पत्नी यांना ते भारतातून घालून आलेले कपडे पालटायला लावले. एवढेच नव्हे, तर त्यांनी कपाळाला लावलेली टिकली, कानातील कर्णफुले, बांगड्या, तसेच मंगळसूत्रही काढून घेतले. पाकचा द्वेष एवढ्यावरच थांबला नाही, तर या तिघांना मराठी या त्यांच्या मातृभाषेत बोलू दिले गेले नाही. परिणामी त्यांना इंग्रजीत संवाद साधावा लागला. भारतीय परराष्ट्र खात्याचे अधिकारी रविश कुमार यांनी ही संतापजनक माहिती दिली. ‘त्या दोघींपर्यंत पाकच्या प्रसारमाध्यमांना जाऊ न देण्याचा करार झालेला असतांनाही पाकने माध्यमांना त्यांच्यापर्यंत जाऊ दिले आणि त्यांना वाट्टेल ते प्रश्न विचारण्यात आले’, असेही रविश कुमार यांनी सांगितले. पाकच्या या वागणुकीवरून भारताने पाकचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
कुलभूषण जाधव यांचा कान आणि डोके यांवर जखमा
पाकिस्तानच्या कह्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा उजवा कान आणि डोके यांवर जखमांचे व्रण आढळून आले आहेत. कुलभूषण जाधव यांना २५ डिसेंबर या दिवशी त्यांची आई आणि पत्नी पाकमध्ये जाऊन भेटल्या. या त्यांच्यातील संभाषणावेळच्या पाकनेच प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांतून त्यांच्या उजव्या कानावरील आणि डोक्यावरील जखमांचे व्रण स्पष्टपणे दिसून आले. यावरून पाकने जाधव यांचा पोलीस कोठडीत अमानुष छळ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधव यांच्या शरिरावरील जखमा झाकण्यासाठीच पाकने त्यांना भेटीच्या वेळी घालण्यासाठी वेगळा कोट दिल्याचेही सांगितले जात आहे.
जाधव आणि कुटुंबिय यांच्यामध्ये होती काचेची भिंत !
पाकने जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांची घडवून आणलेली भेट ही निवळ फार्स ठरली आहे; कारण जाधव आणि त्यांच्या आई अन् पत्नी यांच्यामध्ये एक काचेची भिंत होती, तसेच त्यांच्यात दूरभाषवरून संभाषण झाले. या तिघांची समोरासमोर भेट होऊ शकली नाही. या भेटीची छायाचित्रेही पाकने प्रसिद्ध केली आहेत.
‘शिपिंग कंटेनर’मध्ये भेट !
ही भेट परराष्ट्र्र मंत्रालयातील कार्यालयात न घडवून आणता ती एका ‘शिपिंग कंटेनर’मध्ये घडवून आणल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या सर्वांमुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे.
कुटुंबियांची सुषमा स्वराज यांच्याशी भेट
पाकमधून जाधव यांच्या आई आणि पत्नी २६ डिसेंबरला भारतात परतल्या. या वेळी त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयशंकरही उपस्थित होते. त्यांच्यात तब्बल ३ घंटे चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात