हज यात्रेला कोट्यवधींचे अनुदान देणारे केंद्र सरकार हिंदूंच्या मेळ्यासाठी तिकिटावर अधिभार लावते, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वाराणसी : प्रयाग माघ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिटांवर लावलेला अधिभार रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठांच्या एका शिष्टमंडळाने येथे केली. माघ मेळ्यासाठी प्रयाग येथे लाखो भाविक येतात. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भाविकांना माघ मेळ्याला येण्यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. याविषयीचे निवेदन या शिष्टमंडळाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहे. यापूर्वीही रेल्वे प्रशासनाने नाशिक येथे झालेले सिंहस्थ महापर्व, ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेला विध्यांचल (उत्तरप्रदेश) आणि मेहर (मध्यप्रदेश) येथील सुप्रसिद्ध नवरात्री यांनिमित्तही रेल्वेने प्रवासी तिकिटांवर अधिभार लावला होता.
या निवेदनात म्हटले आहे, माघ मेळ्यासाठी प्रयागला येणार्या भाविकांना २ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत अधिभार (मेला सरचार्ज) आकारला जाणार आहे. याउलट हज यात्रेकरूंसाठी मुसलमानांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तसेच त्यांना विशेष वैद्यकीय सुविधाही पुरवली जाते. म्हणूनच रेल्वे प्रशासनाचा तिकिटावर अधिभार लावण्याचा निर्णय हा अत्यंत अन्यायकारी, भेदभाव करणारा, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. या निर्णयामुळे हिंदूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्ष न्यायप्रणालीत सर्व धर्मांना समान न्याय मिळणे आवश्यक असतांना हिंदूंच्या संदर्भात मात्र तो दिसून येत नाही. यामुळे सरकारने हा अधिभार त्वरित रहित करावा.
या शिष्टमंडळात विश्व हिंदु महासंघाचे शिवपूर मंडलाचे अध्यक्ष श्री. शुभम मिश्रा, हिंदु जागरण मंचचे अध्यक्ष श्री. रवी श्रीवास्तव, विश्व हिंदु युवा शक्तीचे श्री. विक्रम कुमार, समाजसेवक श्री. अनिल सिंह सोनू आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. याविषयी सुलतानपूरच्या जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात