Menu Close

हिंदुत्वनिष्ठ अन् ग्रामस्थ यांचा विरोध झुगारून अखेर ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रारंभ

कायदा आणि संस्कृती यांपेक्षा सत्ता अन् पैसा वरचढ ठरला

पुणे : स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा तीव्र विरोध झुगारून ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ११ व्या पर्वाला अखेर २८ डिसेंबरला लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे प्रारंभ झाला. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी याआधी करचुकवेगिरी करून सरकारची केलेली फसवणूक, वृक्षतोड, अवैध उत्खनन आणि डोंगर सपाटीकरण, ध्वनीविषयक नियमांचे उल्लंघन, मद्यबंदीच्या ठरावाचे उल्लंघन आदी कायदेशीर सूत्रे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शासन-प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली होती. याआधी गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांचा व्यापार आणि पाश्‍चात्त्य विकृतीच्या उदात्तीकरणामुळे युवापिढीवर होणारे दुष्परिणाम यांकडेही लक्ष वेधण्यात आले होते; मात्र या विरोधाची स्थानिक स्तरावर, तसेच राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही नोंद घेण्यात आली नाही. यंदाच्या वर्षी आयोजकांनी अपेक्षित ३० सरकारी अनुमतींपैकी किती अनुमती घेतल्या असतील, याविषयी साशंकता आहेच. तरीही हा कार्यक्रम होऊ घातल्याने कायदा अन् संस्कृती यांपेक्षा सत्ता आणि पैसा वरचढ ठरला, अशीच भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कार्यक्रमस्थळाच्या आसपास लक्षात आलेली सूत्रे

कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी १० ते १५ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत, तसेच जागोजागी सुरक्षारक्षक (बाऊन्सर्स) नेमण्यात आले आहेत. लवळे गावातील एका रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या कथित सुरक्षिततेसाठी गावात जाणार्‍या नागरिकांची अडवणूक करण्यात येत आहे. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणीही करण्यात येत असून छातीत धडकी भरवणार्‍या आवाजात डीजे लावण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत हा गोंगाट सहन करावा लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये अप्रसन्नतेचे वातावरण आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *