Menu Close

श्री मलंगगडावर हिंदूंना आरती आणि पूजन करण्यास धर्मांधांकडून पुन्हा मज्जाव

  • आमच्या पद्धतीने उत्तर देणार ! – शिवसेनेची चेतावणी

  • किल्ले दुर्गाडीतील मंदिरात आरतीलाही विरोध

प्रत्येक वेळी हिंदूंच्या धार्मिक गोष्टींच्या रक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या शिवसेनेचाच हिंदूंना आधार वाटतो !

धर्मांधांची मोगलाई ! हिंदूंच्या धार्मिक स्थळी एक एक करत हिंदूंचे अधिकार नाकारणार्‍या धर्मांधांचे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी लांगूलचालन केल्यामुळेच ते हिंदूंशी वारंवार उद्दामपणा करण्याचे धाडस करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

 

कल्याण : कल्याणजवळ श्री मलंगगडावर पुन्हा एकदा हिंदूंना प्रतिबंध करण्याचे प्रकार चालू झाले असून आरती करण्यास मज्जाव केला जात आहे. तसेच कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवरील देवीचे मंदिर हिंदूंचे असल्याचा निर्वाळा न्यायालयाने देऊनही काही धर्मांधांकडून अपप्रचार आणि दहशत पसरवली जात आहे. याविषयी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी कारवाई न केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ. तसेच यापुढेे मलंगगडावर केवळ वर्षातून एकदा नव्हे, तर प्रतिमासाला महाआरती करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळ लांडगे यांनी २८ डिसेंबरला येथील पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या वतीने कल्याण येथील टिळक चौकातील शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या प्रसंगी शहरप्रमुख श्री. विश्‍वनाथ भोईर, श्री. दिनेश देशमुख, महिला आघाडीच्या विजया पोटे, परिवहनचे माजी सभापती श्री. रवींद्र कपोते, श्री. दीपक सोनाळकर आदी उपस्थित होते.

श्री. लांडगे पुढे म्हणाले की,

१. हाजी मलंग बाबा ट्रस्टच्या ‘लेटरहेड’वर एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले होते. त्यामध्ये लिहिले होते की, ‘त्या ठिकाणी हिंदु संघटना येतात. आरती करतात. त्यामुळे हिंदु-मुसलमान यांत तेढ निर्माण केली जात आहे.  हिंदूंनी गडावर आरती करू नये. आरती केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.’ असे प्रसिद्धीपत्रक काढणारी ट्रस्ट ही नोंदणीकृत नाही.

२. मलंगगड हा श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा न्यास या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. या न्यासाला ‘ई-६०’ हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानुसार हे देवस्थान सर्व धर्मियांसाठी खुले आहे. तरीसुद्धा एका ट्रस्टने त्याची नोंदणी नसतांना प्रसिद्धीपत्रक काढून हिंदूंची वहिवाट असलेल्या मलंगगडावर हिंदूंना आरती, पूजन करण्यासाठी मज्जाव केला आहे.

३. या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने तक्रार दिली आहे. त्याचसमवेत उल्हासनगर पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे; मात्र पोलिसांनी काही कारवाई न करता केवळ आश्‍वासन दिलेले आहे.

४. मलंगगडावर २ जानेवारीला पौष पौर्णिमा, १४ जानेवारीला संक्रांतीला आणि ३१ जानेवारीला पालखी सोहळा हे उत्सव साजरे केले जाणार आहेत. यापुढे केवळ उत्सवाच्या वेळीच गडावर न जाता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आरती केली जाईल.

५. ट्रस्टीने चालू केलेला अपप्रचार असून तो बंद करावा अन्यथा त्यांचा बंदोबस्त शिवसेना करील.

कल्याणच्या किल्ले दुर्गाडीतील मंदिरातही आरतीला मज्जाव

श्री. गोपाळ लांडगे यांनी पुढे सांगितले की, कल्याणच्या किल्ले दुर्गाडीला सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचा दर्जा देऊन ‘हे हिंदूंचे देवस्थान आहे’, असा निकाल दिला आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीमागे मुसलमान वर्षातून दोन वेळा नमाजपठण करतात. त्या वेळी त्या ठिकाणीही हिंदूंना फिरकू दिले जात नाही, तसेच मंदिरात आरतीला मज्जाव केला जात आहे. मुसलमानांकडून घातली जाणारी बंदी अवैध आहे. आघाडी सरकारने मंदिराची जागा ही वक्फ बेार्डाकडे दिली. मुसलमानांची वहिवाट नसतांना त्या ठिकाणी मंदिराची जागा वक्फ बोर्डाची होऊ शकत नाही. तरीसुद्धा वक्फ बोर्डाने कल्याण न्यायालयात ही जागा वक्फ बोर्डाकडे वर्ग करावी, असा दावा प्रविष्ट केला आहे. हा दावा वर्ष १९७६ पासून कल्याण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी येत्या २ जानेवारीला होणार आहे. ही जागा हिंदूंची वहिवाट असल्याने वक्फ बोर्डाकडे वर्ग करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. हिंदू आरती करून धर्मात तेढ निर्माण करीत नसून त्यांना आरतीचा अधिकार नाकारणारे लोकच समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी शिवसेनेची मागणी आहे. दुर्गाडी किल्ल्याची नासधूस झाली आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम चालू आहे. कंत्राटदाराच्या ढिसाळपणामुळे त्यात दिरंगाई होत असून त्या कामावर शिवसेनेचे बारीक लक्ष आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *