Menu Close

संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’विषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हिदुत्वनिष्ठ यांचा वाढता रोष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संस्कृतीहीन कार्यक्रम होणे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पुणे : स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध डावलून संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ डिसेंबरपासून चालू झाला असला, तरी त्याविरुद्ध रोष वाढत आहे. याविषयी लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे देत आहोत.

सनबर्नला विरोध होत असतांना शासनाचा पाठिंबा का ? – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती, पुणे

सनबर्नच्या विरोधात ग्रामस्थांनी कित्येक वेळा प्रशासनाला अनुमती न देण्याविषयी मागणी केली. या संदर्भात त्यांनी ठरावही केला आणि आंदोलन केले. ग्रामस्थांसह अनेक संघटना, संप्रदाय यांचाही सनबर्नला विरोध असतांना शासन त्यांना पाठिंबा देते हे लोकशाहीचे अपयशच. सनबर्नवर भ्रष्टाचाराचे आरोप, शासनाचा कर चुकवणे, अनेक गुन्हे प्रविष्ट असणे, असे सर्व असूनसुद्धा शासन आणि प्रशासन समाजाचा विरोध झुगारून अशांच्या मागे ठामपणे उभे राहते, हीच त्यांची खरी पारदर्शकता आहे का ?

सनबर्न फेस्टिव्हलला आमचा शेवटपर्यंत विरोध राहील ! – किरण दगडे पाटील, नगरसेवक, कोथरूड

आम्ही ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही काही उपयोग झाला नाही. कोणत्या अनुमतींच्या आधारे सनबर्नला अनुमती दिली ते शासन आणि प्रशासन यांनी उघड करावे. सनबर्नकडून दिल्या जाणार्‍या खोट्या कागदपत्रांविषयी न्यायालयाने चौकशी करायला हवी. सनबर्नविषयी सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सनबर्न फेस्टिव्हलला आमचा शेवटपर्यंत विरोधच राहील.

पुण्यात सनबर्न होणे आपल्या संस्कृतीला लाजिरवाणे ! – पू. सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ समर्थभक्त, पुणे

भाजप आणि शिवसेना हे दोघेही हिंदुत्वाचे कैवारी आहेत. शिवसेना, भाजपचे हिंदुत्व खरे असेल, तर त्यांनी तो कार्यक्रम तातडीने थांबवावा आणि आयोजकांना कह्यात घ्यावे. पुण्यात उजळ माथ्याने सनबर्न कार्यक्रम होत आहे. भारतीय संस्कृतीलाही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतका विरोध करून, इतक्या ठिकाणी अनुमती नाकारूनही ते नाकावर टिच्चून कार्यक्रम घेत आहेत. ‘तुम्ही काहीही करा, आम्हाला कोणी रोखू शकत नाही’, अशी त्यांची बदमाशी, अरेरावी दिसून येते. राजकीय अधिकारी पैसे घेऊन त्यांची कामे करत असणार किंवा नेता पाठीशी आणि राजकीय प्रभाव असल्याविना ते असे धाडस करू शकणार नाहीत. आम्ही असा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला लगेच अटक करतील. त्यांना केवळ मद्यामधून महसूल हवा आहे. यावर उपाय म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात अशा कार्यक्रमांना अनुमतीचा प्रश्‍नच नसेल; कारण हिंदु राष्ट्रात असे लोक कारागृहात असतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *