१. स्त्रियांनी मद्यपान करणे, हा मद्यपान परंपरेचा भाग असे सांगणारे पुरोगामी !
पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते. त्यांना अतीमद्यपानामुळे बचतीची उधळण, घरगुती भांडणे, कुटुंबाची वाताहत होणे आदी दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. भारतातल्या शहरी भागात मद्यपान करणेे, ही एक फॅशन झाली आहे. पूर्वी या गोष्टींकडे वाईट नजरेतून पाहिले जात असे आणि सुशिक्षित घरातील व्यक्ती मद्यपान करत नसत. स्त्रियांनी मद्यपान करणे हा एक मद्यपान परंपरेचा भाग आहे, असे प्रसारमाध्यमे सांगत असतात. हे खरोखरच स्त्रियांच्या समान अधिकारांचे पुरस्कर्ते आहेत का ?
२. दारू पिणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा निष्कर्ष
अभ्यासांती असे लक्षात आले आहे की, दारू ही पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक हानीकारक आहे. दारू पिणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक धोकादायक आहे, असा निष्कर्ष अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (यू.एस्. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ) काढला आहे. अॅडीक्शन अॅन्ड सबस्टन्स अॅब्यूज (व्यसन आणि पदार्थाचे अतीसेवन) या कोलंबिया येथील केंद्रात केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा महिलांना लवकर व्यसन लागते.
केंद्राचे संचालक सुसान फोस्टर यांच्या मतानुसार पुरुषांच्या शरिराशी तुलना करता महिलांच्या शरिरात पाण्याचे प्रमाण अल्प असून चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये दारू शोषून घेण्याचे प्रमाण जास्त असते. महिलांमध्ये अल्कोहोलचे विघटन करणार्या, अल्कोहोल डीहायड्रोजीनेज या एन्झाईमची कार्य करण्याची शक्ती अल्प असते.
३. दारू पिण्यामुळे अमेरिकेतील ३ लक्ष ५० सहस्र महिलांच्या आरोग्याला धोका !
अल्प मात्रेमध्ये अल्कोहोल घेणार्या महिलांनाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते, तसेच ५५ वर्षांखालील महिलांचा हृदयविकारापासूनही बचाव होत नाही. अतीमद्यपान केल्यामुळे यकृताचे आजार, कर्करोग, मेंदूचे, तसेच हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थे (एन्.आय.एच्.)च्या अहवालानुसार दारू पिण्यामुळे अमेरिकेतील ३ लक्ष ५० सहस्र महिलांच्या आरोग्याला धोका पोचला आहे. अतीमद्यपान हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक धोकादायक आहे. मद्यपान हे लैंगिक अत्याचाराचे प्रमुख कारण आहे.
– संक्रांत सानू (संदर्भ : रेडिफचे संकेतस्थळ)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात