मान्वी (रायचूर, कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
मान्वी (रायचूर, कर्नाटक) : भारतात ८५ टक्के हिंदू असूनही त्यांच्या स्वत:च्या हक्कांसाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. काश्मीर, बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वनिष्ठांच्या एकापाठोपाठ एक हत्या होत आहेत. हे हत्यासत्र रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी एक झाले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्यातील पदाधिकारी श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. कुलकर्णी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. कुलकर्णी यांच्यासह हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता चेतन मणेरीकर, सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते. या सभेला १ सहस्र ३०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर आणि हिंदु जनजागृती समिती श्री. गुरुप्रसाद गौडा यांनीही मार्गदर्शन केले.
अधिवक्ता चेतन मणेरीकर यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या समाज आणि हिंदु विरोधी कारभाराचा बुरखा फाडला
अधिवक्ता चेतन मणेरीकर म्हणाले की,
१. कर्नाटकात वर्ष २०१३-१४ पासून नवीन मशीद आणि चर्च यांची उभारणी करण्यासाठी, तसेच अस्तित्वातील मशीद अन् चर्च यांचे नुतनीकरण करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये देत आहे. हे पूर्णपणे अनधिकृत आणि घटनाबाह्म आहे.
२. कर्नाटक सरकार पेश इमाम यांना प्रतिमास ४ सहस्र रुपये, तर मोझिन यांना ३ सहस्र रुपये मानधन देते. तथापि असे मानधन हिंदु मंदिरांतील पुजार्याला मात्र दिले जात नाही.
३. राज्यात गेल्या ५ वर्षांत २० हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होऊनही केवळ सत्ताधारी पक्षाच्या राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांतील दोषींना शिक्षा होऊ शकली नाही.
४. कर्नाटक सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या १ सहस्र ४०० समाजकंटकांवरील गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले मागे घेतले. या समाजकंटकांनी पोलिसांवर घातक शस्त्रांद्वारे आक्रमण केले असून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अशा समाजकंटकांवरील खटले मागे घेतल्यास त्यांचे मनोधैर्य उंचावेल, अशी चेतावणी पोलिसांनी सरकारला देऊनही कर्नाटक सरकारने पोलिसांच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत समाजकंटकांवरील खटले मागे घेतले.
५. सत्तेत आल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत लाभ मिळवणे आणि भ्रष्टाचार लपवणे, यांसाठी लोकायुक्त संस्था कमकुवत केली.
६. सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे पोलीस उपअधीक्षक एम्.के. गणपती, तसेच भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस्) अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या केली; मात्र तरीही यातील दोषी अद्याप उजळ माथ्याने फिरत आहेत. आय.पी.एस्. अधिकारी अनुपमा शेणॉय यांनीही राजकीय दबावामुळे त्यागपत्र दिले आहे.
७. राज्यात गोरक्षणाविषयी कायदा असूनही सत्ताधारी पक्षातील वजनदार लोकांच्या आश्रयाखाली रात्रंदिवस गोहत्या चालू आहे.
८. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भ्रष्टाचारात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
९. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे.
समाजकंटकांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी जात, पंथ बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटित झाले पाहिजे. काहीही झाले, तरी हिंदूंनी हिंदुत्वाचे कार्य करणे कधीच थांबवू नये. हिंदूंचे कायद्याद्वारे रक्षण करण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद सदैव सिद्ध आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात