श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे ७ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभा
नगर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ७ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यासह पारनेर, जामखेड, नेवासा, राहुरी, संगमनेर हे ५ तालुके आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथील गावांमध्ये, तसेच शहरी भाग येथे एकूण ९० हून अधिक बैठका झाल्या आहेत. त्याला समाजातील धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये शहरी भागातून २ सहस्र, तर ग्रामीण भागातून ३ सहस्र जणांनी सहभाग घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. बैठकांमध्ये उपस्थितांनी सभेच्या ठिकाणी विविध भागांतून येतांना वाहनांना भगवा ध्वज लावून येणार असल्याचे सांगितले.
२. बेलापूर, सूर्यानगर आणि अशोक पार्क येथील अन् विविध ठिकाणच्या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या धर्माभिमानी महिलांनी वाहनफेरीला येण्याची सिद्धता दर्शवली, तसेच त्यांनी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील दिशा स्पष्ट करून घेतली. याचसमवेत महिला केशरी रंगाच्या साड्या नेसून वाहनफेरीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.
३. जय श्रीराम मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ आणि मोरगे वस्ती येथील नागरिकांनी पारंपरिक वेशात सभेला येणार असल्याचे सांगितले.
४. समाजातील धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे निवास आणि भोजन यांची व्यवस्था करण्यासाठी साहाय्य केले.
हिंदु जनजागृती समितीविषयीचे अभिप्राय
१. समितीचे कार्य अतिशय चांगले आहे. समितीने आयोजित केलेली धर्मजागृती सभा व्हायलाच हवी. तुम्ही सर्वजण एवढे दूर येऊन प्रसार करत आहात, ही कौतुकाची गोष्ट आहे. आम्ही या सभेला अवश्य येऊ ! – एक धर्माभिमानी नागरिक
२. ही सभा झाल्यानंतर चांगले घडेल. हिंदुत्वाच्या कार्याला पाठिंबा आणि उभारी मिळेल, तसेच आमचे कार्य स्थूलातील असून तुमची सूक्ष्म शक्ती कार्यरत आहे.
– धर्माभिमानी श्री. अतुल वडनेर, शिवाजीनगर, श्रीरामपूर.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात