कोल्हापूर : कोरेगाव भीमा प्रकरणी जमावाने येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड चालू करून हैदोस घातला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले. हिंदुत्वनिष्ठांनी प्रतिमोर्चा काढत शहरातून दुचाकी फेरी काढली. शिवाजी चौक येथे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटित होऊन त्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक श्री. रवि इंगवले यांनी रस्त्यावर उतरून सर्वांना शांततेचे आवाहन केले.
हिंदुत्वनिष्ठांनी महाद्वार रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. गुजरीमध्ये जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. (जिथे पोलिसांचेच रक्षण करावे लागत असेल, तिथे ते जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सिद्धार्थनगर परिसरात हिंदुत्वनिष्ठ संघटित झाले होते.
दैनिक तरुण भारतच्या कार्यालयावर दगडफेक
कोल्हापूर येथील दसरा चौकातील दैनिक तरुण भारतच्या कार्यालयावरही राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आलेल्या जमावाने अचानक दगडफेक केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. हे कार्यकर्ते दैनिकाच्या कार्यालयातही घुसण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जमाव मागे फिरला.
वाहनांची तोडफोड होत असतांना शिवसेना गप्प बसणार नाही ! – आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेचा शिवसेना निषेध करते. आमचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा आहे; मात्र काही लोकांनी वाहनांची तोफफोड करून जी हानी केली, तिच्या विरोधात शिवसेना गप्प बसणार नाही. यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘प्रति मोर्चा’ काढला आहे. सरकारने हानीभरपाई द्यावी; कारण सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अल्प पडत आहे, असे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात