सातारा : भीमा कोरेगावला झालेली दंगल आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचा दुरान्वयेही संबंध नाही. नक्षलवाद्यांचा म्होरक्या असलेला मिलिंद तेलतुंबडे याचा भाऊ आनंद तेलतुंबडे हा एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक होता. हे दोघे भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांचे मेहुणे आहेत.
या दंगली भडकवण्यामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे पुढे येत आहे. हे सर्व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर आणि नक्षलवादी यांच्यातील संबंधांची तातडीने चौकशी करण्यात यावी, तसेच दंगल भडकवून देशात अस्थिरता निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा सहकार्यवाहक श्री. सागर आमले यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी जिल्हा सहकार्यवाहक सर्वश्री काशिनाथ शेलार, सतीश ओतारी, संदीप जायगुडे, संतोष काळे आणि केदार डोईफोडे उपस्थित होते.
श्री. आमले पुढे म्हणाले,
१. प्रकाश आंबेडकर हे पू. भिडेगुरुजी शिवस्वराज्य संघटनेचे असल्याचे म्हणतात. ज्यांना पू. गुरुजींच्या संघटनेचे नावही ठाऊक नाही, अशांना त्यांच्या कार्याविषयी कितपत माहिती असेल ? यावरून प्रकाश आंबेडकर यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे, हेही स्पष्ट होते. त्याचा शासनाने शोध घ्यावा.
२. दंगलीला एल्गार परिषदेतील भडकाऊ भाषणांतून चिथावणी मिळाल्याचे समोर येत आहे. बाजीराव पेशव्यांचे स्मारक ठेवणार नाही, पुढच्या वर्षी शनिवारवाडाही ठेवणार नाही, अशी चिथावणीखोर भाषा वापरण्यात आली. यावरून हे सर्व पूर्वनियोजित होते, हे लक्षात येते.
३. देशविरोधी घोषणा देणार्या उमर खालिदचा या स्मारकाशी कोणताही संबंध नसतांना अशांना महाराष्ट्रात आयात करणार्यांचा हेतू शुद्ध नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी.
४. पोलिसांत प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीत पू. संभाजीराव भिडेगुरुजींना घटनास्थळी चिथावणी देतांना प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख आला आहे. पू. गुरुजी त्या वेळी आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री निवर्तल्याने त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे. खोटा गुन्हा नोंद करण्यासाठी कोणाचा दबाव होता, हे जनतेसमोर आले पाहिजे.
उपस्थित मान्यवरांनी उपस्थित केलेली अन्य सूत्रे
१. श्री. काशिनाथ शेलार : शौर्यदिन अनेक वर्षांपासून साजरा होत आहे; मात्र यापूर्वी कधी दंगल झाली नव्हती. याच वर्षी दंगल होण्यामागे राजकीय हेतूने प्रेरित लोक कार्यरत असल्याचे दिसत आहे. एल्गार परिषद आणि त्यानंतर झालेल्या घटना पहाता हा पूर्वनियोजित कट असण्याची दाट शक्यता आहे. बंद पुकारून जनतेस वेठीस धरणार्या प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाकडून शासनाने हानीभरपाई वसूल करावी.
२. श्री. सतीश ओतारी : देशसेवेसाठी संपूर्ण जीवन वहाणार्या पू. भिडेगुरुजींची तुलना आतंकवाद्याशी करणे, हा घोर अवमान आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुव्यवस्था बाधित होईल, अशी वक्तव्ये करू नयेत. या तथ्यहीन वक्तव्याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर क्षमा मागावी.
३. श्री. संदीप जायगुडे : पू. भिडेगुरुजींवर जातीयवादाचा आरोप करणे, हे अज्ञानाचे लक्षण आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व अठरापगड जातीचे लोक हिंदुस्थानची सेवा करत आहेत. विद्वेषी वक्तव्ये करणारे उमर खालिद आणि जिग्नेश मेवाणी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ५ जानेवारीला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर निवेदने देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वत्रच्या धारकर्यांनी उपस्थित रहावे, अशी माहिती श्री. संतोष काळे यांनी दिली.
क्षणचित्र
पत्रकार भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोपनीय विभागाच्या पोलिसांनी पत्रकार परिषदेची छायाचित्रे काढली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात