छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले; म्हणून युवकाची हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा द्या !
मुंबई : भीमा-कोरेगाववरील इंग्रजांच्या विजयदिनाच्या निमित्ताने झालेल्या दंगलीत राहुल पठांगडे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दंगलीत कोणताही सहभाग नसतांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले असल्याने या युवकाची हत्या करण्यात आली, अशी वृत्ते माध्यमांतून येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी माहिती का दाबून ठेवली ? या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जॅकेट घातल्याने एखाद्याची हत्या होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी ही घटना आहे. हिंदु जनजागृती समिती या हत्येचा निषेध करते. या निर्घृण हत्या करणार्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे. या मारेकर्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही वैध मार्गाने पाठपुरावा करू, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका म्हटले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, ४ वर्षांपूर्वी पुण्यातच मोहसीन शेख या युवकाची हत्या झाली. ती कोणी केली, हे आजवर सिद्ध झालेले नाही, तरीही हिंदु राष्ट्रसेनेचे प्रमुख श्री. धनंजय देसाई गेली ४ वर्षे कारागृहात आहेत. दंगलीला चिथावणी देणारे आणि रस्त्यावर उतरून युद्धाची भाषा करणारे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद मात्र अद्याप मोकाट का आहेत ? ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणारा अन् देशद्रोहाचा खटला प्रविष्ट झालेला उमर खालिद आणि मेवाणी यांना पुण्यात येऊन अशी भाषणे देण्याची व्यवस्था करणार्यांचे अदृश्य हात कोणते आहेत, हे शोधले पाहिजे. राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्यामागे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे का, याची राज्यशासनाचे विशेष पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात