मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीमध्ये पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे नाव गोवण्यात आले आहे. या दंगलीमागे जातीयवादी संघटना आहेत. संभाजी ब्रिगेड, बामसेफ यांसह एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या सर्व संघटना या दंगलीमागे असण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता चेतन बारस्कर यांनी केले. ५ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबईचे कार्यवाह श्री. बळवंत दळवी, नवी मुंबईचे प्रमुख श्री. भरत माळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या वेळी सभागृहाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वेळी अधिवक्ता बारस्कर म्हणाले,
१. अनिता साळवे या महिलेने पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात पोलिसांकडे अत्यंत खोटी साक्ष नोंदवली आहे. या साक्षीमध्ये पू. संभाजी भिडेगुरुजी पुणे येथे असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात गुरुजी त्या दिवशी सांगली येथे होते.
२. गडकोट मोहीम आणि रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या कार्यासाठी मागील १० दिवसांपासून पू. संभाजी भिडेगुरुजी रात्रंदिवस पायपीट करत आहेत. कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीशी त्यांचा काहीही संबंध नाही.
३. याकूब मेमन याचे समर्थक कोण आहेत, तेच या दंगलीमागे आहेत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी गुरुजींना याकूब मेमनप्रमाणे गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
४. १८ पगडजातीचे लोक मोहिमेला एका शिदोरीतले अन्न जेवतात. आम्ही कुणाला जात विचारत नाही. ‘शिवछत्रपती’ ही आमची जात आहे.
५. गुरुजींनी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्यांचे निवेदन दिले आहे.
६. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये जे पुढे येईल, त्याला आम्ही सामोरे जाऊ.
गुरुजींवर आरोप करणार्यांचा बोलवता धनी कोण, याचा शोध घ्यावा ! – बळवंत दळवी, मुंबई कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
गुरुजींची मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली सभा व्हावी, यासाठी आम्ही मागील महिनाभर दिवसरात्र शिवभक्तांच्या भेटी घेत आहोत. ही दंगल घडवण्यामागे देशविघातक शक्ती असून मराठा-ब्राह्मण-दलित यांच्यामध्ये फूट पाडण्याचा हा जातीयवादी संघटनांचा प्रयत्न आहे. गुरुजींच्या विरोधात साक्ष देणारे, त्यांच्यावर आरोप करणारे यांचा बोलवता धनी कोण आहे ?, याचा शासनाने शोध घ्यायला हवा. आम्ही जातीयवादी नव्हे हिंदुत्वाचे कार्य करतो.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सनातन संस्थेचा संबंध काय ? – ‘मुंबई मिरर’च्या पत्रकार अलका धुपकर यांचा विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे. सनातन संस्थेचे सांगलीत कार्य आहे. सनातन संस्था आणि तुमचा काही संबंध आहे का ? , असा प्रश्न ‘मुंबई मिरर’च्या पत्रकार अलका धुपकर यांनी पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर अधिवक्ता चेतन बारस्कर यांनी ‘जे भगव्या झेंड्याला मानतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात, त्या सर्वांना आम्ही आमचेच मानतो’, असे उत्तर दिले.
पू. संभाजी भिडे गुरुजी यांची सभा पुढे ढकलली
मुंबई लालबाग येथे ७ जानेवारी या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सार्वजनिक सभा होणार होती; मात्र कोरेगाव भीमा वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून ही सभा पुढे ढकलण्यात आल्याचे या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात