मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसमवेत बोलावली बैठक
पणजी : गोवा पोलिसांकडून राज्यात गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि शेजारील राज्यांतून गोव्यात अवैधपणे केली जाणारी गोमांसाची वाहतूक यांच्या विरोधात सातत्याने कारवाई होत आहे. यांवर आळा घालण्यासाठी कुरेशी मीट ट्रेडर्स संघटनेच्या बॅनरखाली गोव्यात गोमांस विक्री करणार्या विक्रेत्यांनी शासनावर दबाव आणण्यासाठी ६ जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी राज्यात गोमांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ७ जानेवारीलाही राज्यात गोमांसाचा पुरवठा झाला नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमांस विक्रेत्यांची समस्या सोडवण्यासाठी मंगळवार,९ जानेवारी या दिवशी पोलिसांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले आहे.
गोमांस विक्रेत्यांच्या मते, प्राणी कल्यास संघटनाचे प्रतिनिधी आणि अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी सतावणूक करत आहेत. नाताळ आणि पाश्चात्त्य नववर्षाच्या काळात पाच ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. यामुळे गोमांस विक्री व्यवसाय करणे कठीण झाले आहे. गोरक्षकांकडून होणारी सतावणूक थांबेपर्यंत गोव्यात गोमांस विक्री बंद ठेवली जाणार आहे. (स्वतः अवैधरित्या गोमांस वाहतूक करायची आणि आरोप गोरक्षकांवर करायचा, ही आहे गोमांस विक्रेत्यांची वृत्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) गोव्यात गोमांस आणण्यासंबंधी प्रक्रिया अधिक सुलभ करेपर्यंत गोमांस विक्री बंद करण्यात येईल. (मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोमांस विक्रेत्यांच्या या धमक्यांना जराही भीक घालू नये. त्याऐवजी गोमांस खाणे मनुष्याला किती हानीकारक आहे, यासंबंधी प्रबोधनपर मोहीम राबवावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गोमासांचा तुटवडा दूर व्हावा, यासाठी काही इंग्रजी प्रसारमाध्यमे सक्रीय
गोव्यातील काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी गोमांसाचा तुटवडा हा विषय रेटून धरला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने या विषयावर अग्रलेख लिहून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे, तर अन्य एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राने कॅटरर (समारंभामध्ये जेवण पुरवणारे) गोमांसाच्या तुटवड्यामुळे कशा प्रकारे अडचणीत सापडले आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अनेक कॅटररच्या प्रतिक्रियाही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत.
गोमांस पुरवठ्याला अनुसरून कोणीचीही दादागिरी खपवून घेणार नाही ! – मायकल लोबो, उपसभापती, गोवा विधानसभा
गोवा शासन कार्यकर्ते किंवा संघटना यांची गोमांस पुरवठ्याला अनुसरून दादागिरी खपवून घेणार नाही. (कायदा मोडणारे गोमांस विक्रेते आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकारणीच दादागिरी करत आहेत. अवैधरित्या गोमांस आणायचे आहे, तर कायदा आणि कशाला करायचा ? कायदा करून जनतेला फसवायचे कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) गोमांस हा गोमंतकियांचा मुख्य आहार आहे. (२० टक्के गोमांसभक्षक म्हणजे सगळे गोमंतकीय नव्हेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) कागदपत्रे नाहीत म्हणून गोमांस विक्रेत्यांची कोणीही सतावणूक करू शकत नाही. संघटनांचे कार्यकर्ते यांचे खरे जर गुरांवर प्रेम असते, तर त्यांनी रस्त्यावर मोकाट फिरणार्या गुरांचा सांभाळ केला असता. (तेही शासनानेच करायचे असते. मोकाट गुरांची व्यवस्था गोरक्षकांनी करायची आणि गुरांची हत्या शासनाने करायची का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मंत्री विजय सरदेसाई यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
गोमांस विक्रेत्यांनी हा विषय नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी त्वरित मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून गोमांस विक्रेत्यांची सतावणूक थांबवण्याची मागणी केली. गोव्यात काही लोक गोमांस पुरवठ्याला अनुसरून अतीउत्साही झाले आहेत. गोवा शासन असित्वात आले, तेव्हा विश्व हिंदु परिषदेला एक कठोर संदेश शासनाने दिला होता. हा संदेश पुन्हा एकदा देण्याची आता वेळ आली आहे. कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. गोवा हे पर्यटनस्थळ आहे आणि पर्यटकांना तुमच्या खाण्याच्या सवयी पालटा असे कोणी सांगू शकतो का ?, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले. (मंत्री विजय सरदेसाई पराचा कावळा करत आहेत. कोणीही कायदा हातात घेतलेला नाही. गोरक्षक पोलिसांच्या साहाय्यानेच अवैध गोमांसाची वाहतूक रोखत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात