वॉशिंग्टन : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी निदर्शन करणाऱ्यांच्या हातात ‘चप्पल चोर पाकिस्तान’चे बॅनर होते. याशिवाय, निदर्शकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला.
गेल्या वर्षी २५ डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये गेल्या होत्या. या भेटीदरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला चप्पल काढायला लावले होते. तसेच दोघींनाही मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकल्याही काढायला लावल्या होत्या. याशिवाय दोघींना त्यांचे कपडेही बदलण्यास सांगितले होते. तसेच, कुलभूषण यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या आई आणि पत्नीला मातृभाषेत म्हणजेत मराठीत बोलू दिले नाही.
अमेरिकेत वसलेले भारतीय आणि बलूच नागरिकांनी पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर सोमवारी निदर्शने करीत, पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला. यावेळी निदर्शने करणाऱ्यांच्या हातात चप्पल चोर पाकिस्तानचे बॅनरदेखील होते. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
संदर्भ : एबीपी माझा