बेंगळुरू येथे भाजपकडून ‘परिवर्तन यात्रे’चे आयोजन
बेंगळुरू : हिंदूंची ताकद पहाताच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला आता हिंदुत्वाची आठवण झाली आहे, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केली. कर्नाटकमधील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘परिवर्तन यात्रे’त ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेस जातीच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडत आहे. हा पक्ष आता देशासाठी एक ओझे बनला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अलीकडे अचानक हिंदुत्वाची आठवण आली असून ते लोकांना ‘मी हिंदू आहे’, असे सांगू लागले आहेत. हिंदुत्वाची ताकद पाहिल्यानेच त्यांना असे वक्तव्य करावे लागत आहे. त्यांचे नेते म्हणजेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मंदिरांत जाण्याचा सपाटा लावला होता. हिंदुत्व ही भारताची जीवनशैली आहे. जात-पात म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपला कर्नाटक राज्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. आता उत्तर आणि दक्षिण भारत येथील जनतेला भाजपच्या विजयासाठी एकत्रित यावे लागेल.’’ योगी आदित्यनाथ यांचा कर्नाटक राज्याचा हा एका मासातील दुसरा दौरा आहे.
योगी आदित्यनाथ यांची निर्मलानंद स्वामी यांच्याशी चर्चा
तत्पूर्वी योगी आदित्यनाथ यांनी निर्मलानंद स्वामी यांच्या मठात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी ‘मी जेव्हा कधी कर्नाटकात येतो, तेव्हा निर्मलानंद स्वामी यांच्या मठात येतो’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात