मिरज : पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीच्या मागे धर्मविरोधी शक्तींचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले आहे, या मताशी लिंगायत समाज पूर्णपणे सहमत आहे. या षड्यंत्राला समाज बळी न पडता लिंगायत समाज हा हिंदु धर्माचा अविभाज्य घटक असेल आणि राहील, असे ठाम प्रतिपादन लिंगायत समाजाच्या विविध पक्ष, संघटना यात सक्रिय असणार्या लोकप्रतिनिधींनी मिरज येथे पत्रकार परिषदेत केले. या वेळी सर्वश्री महेश गवाणे, अभिजित हारगे, महादेव कुरणे, जयगोंड कोरे, मिलिंद हारगे, अमित उदगावे, चंद्रकांत मैगुरे, शुभम पाटील, विनोद जिरगे, अजित सगाई, सिद्धेश्वर जिरगे यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी श्री. महेश गवाणे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी लिंगायत महामोर्च्याचे आयोजन करून स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करण्यात आली. याला समाजातील सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. महात्मा बसवेश्वर यांनी कधीही स्वतंत्र धर्माची घोषणा केली नाही. त्यामुळे लिंगायत महामोर्च्याचे नियोजन आणि मागणी पहाता धर्मविरोधी शक्तींचा पाठिंबा असल्याचे दिसते. हिंदु धर्मविरोधी शक्तींकडून धर्म आणि समाज फोडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे स्पष्ट होते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात