पुणे : हिंदुत्वरक्षण अन् हिंदु राष्ट्र निर्मिती या विषयांवर विचारमंथन आणि कृतीआराखडा ठरवण्यासाठी, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रीकरणासाठी ७ जानेवारी या दिवशी इंद्रप्रस्थ सभागृह, पुणे येथे प्रांतीय हिंदु अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचा आढावा मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार भवन, गांजवे चौक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख, पतित पावन संघटनेचे श्री. विजय गावडे, धर्माभिमानी अधिवक्ता नीलेश निढाळकर, बजरंग दलाचे यशवंत कर्डीले हे उपस्थित होते. या वेळी श्री. अभिजित देशमुख यांनी अधिवेशनात झालेल्या सत्रांविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनीही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आपला सहभाग आणि पाठिंबा दर्शवला. कोरेगाव भीमा येथील दंगलीविषयी बोलताना श्री. अभिजित देशमुख म्हणाले की, एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांविषयीही माध्यमांनी प्रश्न विचारायला हवे, चर्चा करायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात