रत्नागिरी : राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रुजवणार्या दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीने १९ व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने ७ जानेवारीला येथील टी.आर्.पी. जवळील अंबर सभागृहामध्ये दैनिक सनातन प्रभातच्या १८ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते श्री. श्रीनिवास पेंडसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच दैनिक सनातन प्रभातच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यातील मान्यवरांचे उद्बोधक विचार येथे देत आहोत.
शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा बघायचे असेल, तर आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्र हा शब्द प्रथम दैनिक सनातन प्रभातने दिला. वर्ष २०२३ मध्ये येणार्या हिंदु राष्ट्राच्या वैचारिक क्रांतीमध्ये दैनिक सनातन प्रभातची भूमिका महत्त्वाची आहे. हिंदु धर्मावर कायद्याने निर्बंध घालण्याचा खूप प्रयत्न झाला. या वेळी या विधेयकाच्या विरोधात दैनिक सनातन प्रभातने आवाज उठवला. मंदिर सरकारीकरणाविषयीही जनजागृती केली. हज यात्रेला अनुदान दिले जाते; मात्र अमरनाथ यात्रेच्या वेळी मंत्रपठण, घंटानाद करायचा नाही, असे सांगितले जाते. मदरसे, चर्च यांमध्ये मुलांना धर्मशिक्षण दिले जाते; मात्र शाळा ‘सेक्युलर’ म्हणून घोषित केल्या जातात. याच धर्मनिरपेक्षतेवर आसूड ओढण्याचे काम दैनिक सनातन प्रभात करते. गुढीपाडव्याविषयी समाजात पसरवण्यात येणार्या अफवांचा वैचारिक प्रतिवाद दैनिक सनातन प्रभात करते. अध्यात्म, धर्म काय आहे ते जाणून तसे वागायला हवे. अध्यात्मशास्त्र जाणून घेऊन, कृतीत आणून त्याची अनुभूती घेतलेला कधीही त्यापासून ढळत नाही. हेे शास्त्र समजावून देण्याचे कार्य दैनिक सनातन प्रभात करते.
आपल्या लोकशाहीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. स्त्रीला देवता मानणार्या देशात प्रति १४ मिनिटाला १ बलात्कार होतो, या कृषीप्रधान देशात १२ घंट्यांनी एका शेतकर्याची आत्महत्या होते. येथे रस्ते, वीज, पाणी या आवश्यकताही पूरवल्या जात नाहीत. या ७० वर्षांच्या लोकशाहीत शिक्षणक्षेत्रात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले. आरोग्यक्षेत्रात अनावश्यक चाचण्या करणे, भीती दाखवून शस्त्रक्रिया, नैसर्गिक प्रसूती न करता ‘सिझर’ करण्यात येऊ लागले, शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सकाळच्या दुधापासून अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. हे थांबवण्यासाठी आपल्याला मिळालेल्या स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करायला हवे. दैनिक सनातन प्रभात हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेणारा एक दीपस्तंभ आहे. हिंदु राष्ट्राचे केवळ साक्षीदार नव्हे, तर भागीदार होण्याचे भाग्य भगवंताने आपल्याला दिले आहे.
दैनिक सनातन प्रभातचे व्रत पार पाडतांना येणार्या अनंत अडचणी आणि मिथ्या आरोप हेच आपले भांडवल ! – श्रीनिवास पेंडसे
श्री. श्रीनिवास पेंडसे म्हणाले, ‘‘ दैनिक सनातन प्रभातचे व्रत पार पाडतांना आम्हाला अनंत अडचणी येतील त्यांच्याशी सामना करून आपल्याला पुढे जायचे आहे. धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी कोणीतरी येईल आणि काही करील यापेक्षा आपल्याला त्यातील वाटा उचलायचा आहे. यामध्ये अनंत अडचणी येतील, त्रास होईल, मिथ्या आरोप होतील; मात्र हेच आपले भांडवल असेल. पत्रकारितेमध्ये खूप मोठी ताकद आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचे संघटन आणि स्वातंत्र्याचे आंदोलन वृत्तपत्रांमधून उभे केले होते. स्वातंत्र्याचा वणवा महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेरही पेटला याला ‘केसरी आणि मराठा’ हे माध्यम होते. हेच पत्रकारितेचे माध्यम आपल्या हातात आहे.’’
वाचकांचे अभिप्राय
१. यमुना प्रकाश ढवणे, रत्नागिरी : शालेय शिक्षणात इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, सावरकर, थोर पुरुष, देशभक्तीपर गीते, मराठी यांचा माहितीपर अभ्यास असला पाहिजे. त्यामुळे देशाविषयी प्रेम, राष्ट्रभिमान, वैचारिक जागृती मुलांमध्ये निर्माण होईल. आज मुलामुलींना सर्वांना स्वत:चे रक्षण कसे करायचे हे शिक्षण दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात आधात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे.
२. श्री. अविनाश लावेत, नाचणे, रत्नागिरी : हिंदु एकतेसाठी सर्व हिंदु बांधवांचे संघटन करणे, हे फार महत्त्वाचे असून अशा कार्यक्रमांमधून हिंदु बांधव जागृत होतील.
३. श्री. वसंत लक्ष्मण मुळ्ये, मारुती मंदिर, रत्नागिरी : सनातन धर्म हा अनादिकालापासून चालत आला आहे. तो आपल्याला टिकवता आला पाहिजे.
४. स्नेहलता सुधाकर नेने, रत्नागिरी : हिंदु धर्मजागृती निर्माण करायची असेल, तर सनातन प्रभात हे नियतकालिक वाचणे आवश्यक आहे. हिंदु धर्मसत्तेचा अंकुश असणे आवश्यक आहे. हा अंकुश सनातन प्रभात ठेवते.
५. श्री. विश्वास नागेश मेस्त्री, मेर्वी, रत्नागिरी : असे कार्यक्रम प्रती मासातून एक वेळा प्रत्येक पंचक्रोशीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे संघटितपणा वाढून सामाजिक कार्य अधिक सुलभ होईल.
६. श्रीमती पल्लवी पुसाळकर, दादर, मुंबई : हिंदु धर्म, ईश्वरी राज्य यासाठी सनातनने काही लोकांनी उडवलेले शिंतोडे आणि आरोप यांना सडेतोड उत्तर देऊन सनातन प्रभात नियतकालिके, साप्ताहिके अविरत चालू ठेवली आहेत. याचे श्रेय त्यांना आता मिळत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात