चित्रपटावर बंदीसाठी आज राजपूत समाज आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर मोर्चा
मुंबई – इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा अवमान करणार्या चित्रपटावर त्वरित बंदी घातली जाते. जेव्हा हिंदु धर्माचा अवमान होतो, तेव्हा चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि केंद्र सरकार काहीच करत नाही. केवळ चित्रपटाचे नाव पालटून संजय लीला भन्साळी हिंदूंची दिशाभूल करत आहेत. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासास कलंक लावू देणार नाही. राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये हा चित्रपट चालू देणार नाही, अशी चेतावणी राजपूत संघटनेचे नेते श्री. अजयसिंह सेंगर यांनी केला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध झाल्यावर पद्मावती चित्रपटामध्ये काही पालट सुचवून पद्मावत या नव्या नावाने २५ जानेवारी या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या विरोधात १२ जानेवारी या दिवशी मलबार हिल येथील चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या कार्यालयावर सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या वेळी श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली नसल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे. पैसे खाऊन पद्मावती चित्रपटाला अनुमती देण्यात आली आहे. या मोर्च्यात विहिंप, शिवसेना, बजरंग दल, महाराणा प्रताप बटालियन, हिंदू महासभा, महाकाल सेना, राजस्थान राजपूत परिषद, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, राष्ट्रीय करणी सेना, हिंदू सेना, महाराणा ब्रिगेड आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होणार आहेत.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात