छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर केवळ राजकीय हेतूसाठी केल्याचा आरोप
तासगाव (जिल्हा सांगली) : आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील २८८ आमदार हे बिनकामाचे आहेत, असे परखड मतर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे व्यक्त केले. येथे ११ जानेवारीला झालेल्या धारकर्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते. सध्याच्या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, असे का वाटत नाही ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, “आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारणासाठी केला आहे. राज्यकर्त्यांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणे-घेणे नाही. आपला देश आतंकवादामध्ये सापडलेला आहे; मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे सहस्रो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे.”
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात