भाजपशासित केवळ ३ राज्यांनीच ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घातली ! सर्वच भाजपशासित राज्यांची भूमिका एकसारखी का नाही ? कि राज्यानुसार पक्षाची धोरणे पालटतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भोपाळ : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांतही बंदी घालण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना तर ‘या चित्रपटाचे नाव भलेही पालटले असले, तरी हा चित्रपट मध्यप्रदेश राज्यात कुठेही प्रदर्शित होणार नाही म्हणजे नाही’, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना ‘राजमाते’चा दर्जाही दिला होता, तसेच मध्यप्रदेश राज्यात राणी पद्मावती यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही केली होती. त्यामुळे राजपूत समाजाने शिवराज सिंह चौहान यांचा भव्य सत्कारही केला होता. चौहान यांनी आता या चित्रपटाविषयी घेतलेल्या ठाम भूमिकेचे राजपूत समाजाने स्वागत केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही गुजरातमध्ये वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली. राज्यात ‘पद्मावत’च्या विरोधात तीव्र निदर्शने झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात