पणजी – धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी गुन्हेगाराची निर्दोष सुटका होऊनही संबंधित पोलीस अधिकार्यांवर कोणतीही कारवाई न होणे, ही चिंतेची गोष्ट आहे, तसेच यामुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
समितीने या पत्रकात म्हटले आहे की,
१. पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी संशयित फ्रान्सिस परेरा याला कह्यात घेतले आहे. धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यासाठी फ्रान्सिस परेरा हा एकमेव उत्तरदायी व्यक्ती आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. विविध ठिकाणचे क्रॉस, थडगे, श्री महादेव मंदिरातील लिंग, कालकोंडा येथील श्री वेताळ, श्री नागदेव आणि इतर धार्मिक स्थळांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये परेरा यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
२. फ्रान्सिस परेरा यांनी धार्मिक स्थळांचे तोडफोड केल्याचे प्रथम मान्य केले होते; परंतु परेरा याचा हा कबुलीजबाब पुराव्यानिशी सिद्ध करण्यास पोलिसांनी प्रयत्न केलेले नाहीत आणि यासाठी न्यायालयाने निवाड्यात पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
३. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या प्रकरणांमध्ये निर्दोष सुटका होण्यामागील कारणांसंबंधी पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल घेऊन संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते; परंतु आता दोन आठवडे उलटूनही यासंबंधी काहीच कृती झालेली नाही.
४. धार्मिक स्थळांच्या तोडफोडीसारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांच्या अन्वेषणामध्ये पोलीस अधिकार्यांनी निष्काळजीपणा केल्याने गोव्यातील धार्मिक सलोख्याला बाधा निर्माण झाली आहे. गोव्यातील धार्मिक सलोखा टिकून रहाण्यासाठी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
५. या गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला का घेत नाही ? याचाही शासनाने शोध घेतला पाहिजे. संशयित परेरा यांची निर्दोष सुटका व्हावी, यासाठी पोलिसांवर कोणता दबाव आहे का ? किंवा परेरा यांना आतून कोणी साहाय्य करत आहे का ?, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात