चेन्नई : इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. हिंदु मुन्नानीचे संस्थापक निमंत्रक श्री. रामगोपालन् हे या ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशक आहेत. या ध्वनीचित्र-चकतीमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु नेत्यांच्या केलेल्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
श्री. स्वामी पुढे म्हणाले,
१. जिहाद्यांचे ध्येय निश्चित आहे. ते राज्यात विविध शक्तींशी संधान साधून त्यांचा जिहादी कार्यक्रम पुढे नेत आहेत. हिंदूंची स्थिती मात्र महाभारतातील अर्जुनाप्रमाणे झाली आहे. त्यांच्या मनामध्ये नुसता गोंधळ माजलेला आहे. त्यामुळे देशात जिहाद्यांचे फावले आहे. ही गोंधळाची स्थिती दूर सारून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
२. देशात समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करण्याची आवश्यकता आहे. देशातील वाढत्या इस्लामी आतंकवादाला आणि जिहादला काँग्रेस, द्रमुक आणि अण्णाद्रमुक तेवढेच उत्तरदायी आहेत.
श्री. रामगोपालन् म्हणाले, तमिळनाडूमधील वाढत्या इस्लामी आतंकवादाविषयी जागृती करणे, इस्लामी आतंकवादाला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देणे आणि केंद्र अन् राज्य शासनांना इस्लामी कट्टरवाद नियंत्रणामध्ये आणण्यास भाग पाडणे, या उद्देशाने या ध्वनीचित्र-चकतीची निर्मिती करण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये इस्लामी आतंकवादाच्या ३०० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. या घटनांकडे डोळेझाक करून शासन त्याचे अप्रत्यक्षरित्या समर्थनच करत आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी इस्लामी आतंकवादाचा धोका वेळीच ओळखावा आणि तो निपटण्यासाठी संघटित व्हावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात