-
वर्ष २००४ मध्ये देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमावर भानुदास आडभाई यांनी केलेले आक्रमणाचे प्रकरण
-
रायगड जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल
धादांत खोटे आरोप करून सनातनच्या साधकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवू पहाणारे आणि सनातनची अपकीर्ती करणारे यातून काही धडा घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रामनाथ (रायगड) : सनातनच्या साधिका डॉ. स्वाती आडभाई (आताच्या डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे) यांच्या नातेवाइकांनी नोव्हेंबर २००४ मध्ये देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमावर आक्रमण केले होते. या प्रकरणी प्रविष्ट झालेल्या दोन्ही खटल्यांमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मंगला मोटे यांनी साक्षीपुरावे तपासून दोन्ही पक्षांतील काही जणांना निर्दोष सोडून दिले, तर सनातनच्या १२ साधकांना दोषी ठरवले आणि त्यांना त्या दिवशीचे न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत न्यायालयात बसून रहाण्याची शिक्षा सुनावली अन् प्रत्येकी २५० रुपयांचा दंड सुनावला, तसेच दंड न भरल्यास ३० दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. त्या वेळी साधकांनी कायद्याचे पालन करत त्याच दिवशी न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा भोगली आणि दंडही भरला; परंतु न्यायालयाचा आदेश आणि झालेली शिक्षा दोन्ही गोष्टी अन्यायकारक होत्या. त्यामुळे त्या साधकांनी त्या आदेशाच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील रामनाथ (अलिबाग) येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपिल केले. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी २१ डिसेंबर २०१७ या दिवशी झाली. त्या वेळी साधकांच्या वतीने अधिवक्ता र.वि. ओक आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी युक्तीवाद केला.
न्यायालयाने त्या युक्तीवादातील सर्व सूत्रे ग्राह्य धरली आणि ३० डिसेंबर २०१७ ला जिल्हा अन् सत्र न्यायाधीश सेवलीकर यांनी आदेश पारित करत सर्व साधकांना निर्दोष सोडून दिले.
१. ७ नोव्हेंबर २००४ या दिवशी आडभाई यांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी साधकांना मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्यांत मिरचीची भुकटी टाकली. आरंभी साधकांना हे अनपेक्षित होते; परंतु नंतर साधकांनी त्या नातेवाइकांचा प्रतिकार केला. या वेळी नातेवाइकांची इच्छा डॉ. स्वाती आडभाई यांना बळजोरीने घेऊन जाण्याची असावी; परंतु त्या प्रतिकारात साधकांनी नातेवाइकांना अडवून ठेवले आणि पोलिसांना बोलावले. पोलीस आल्यावर त्यांनी नातेवाइकांना कह्यात घेतले आणि घायाळ साधकांना रुग्णालयात नेले. आश्रमाच्या वतीने या प्रकरणाची रितसर पोलीस तक्रारही केली आणि पोलिसांनी नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद करून घेतला.
२. डॉ. स्वाती आडभाई यांचे वडील भानुदास आडभाई यांनीही ‘आम्हाला मारहाण केली, माझ्या चष्म्याची हानी झाली आणि मला आश्रमात कोंडून ठेवले’, अशा आशयाची खोटी तक्रार बर्याच विलंबाने दिली. पोलिसांनी या प्रकरणी खरेतर आधी चौकशी करायला हवी होती; परंतु ती न करता त्या खोट्या तक्रारीचाही गुन्हा नोंदवला.
३. जे घायाळ साधक या मारहाणीमुळे रुग्णालयात औषधोपचारासाठी गेले होते, त्यांची नावे पोलिसांच्या नोंदींमध्ये आली होती. ती सर्व नावे आणि आडभाई कुटुंबियांना आधीच माहिती असलेली काही नावे त्या तक्रारीत आरोपी म्हणून नोंदवली गेली.
४. वरील दोन्ही खटले पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मंगला मोटे यांच्यासमोर सुनावणीस आले. आरंभी साधकांच्या वतीने अधिवक्ता रामदास केसरकर यांनी, तर नंतर अधिवक्ता विश्वास भिडे आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी खटला चालवला.
५. अंती दोन्ही खटल्यांमधील साक्षीपुरावे तपासून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मंगला मोटे यांनी दोन्ही पक्षांतील काही जणांना निर्दोष सोडून दिले, तर काही जणांना ‘बेकायदेशीरपणे ५ हून अधिक जणांचा जमाव जमवला आणि दंगल केली’, असे सांगत दोषी ठरवले.
अधिवक्त्यांनी केलेल्या युक्तीवादातील ग्राह्य धरलेली आदेशातील ठळक सूत्रे
१. मारहाणीची घटना सकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीतील होती. पहिल्या गुन्ह्याची तक्रार सनातनच्या साधकांनी प्रविष्ट केली होता. त्यानंतर आडभाई यांनी केली होती; परंतु आडभाई आणि त्यांचे नातेवाईक यांना पोलिसांनी त्यांच्या जखमांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेले होते. आडभाई आणि त्यांचे नातेवाईक यांना ‘सनातनच्या साधकांनी मारहाण केली आणि त्यामुळे जखमा झाल्या’, हे आडभाईंचे आरोप असल्यामुळे त्या रुग्णालयातील घडामोडी या पुरावा होत्या. सायंकाळी ७.४० वाजता शासकीय वैद्यांनी आडभाईंसमवेत एकूण ७ जणांच्या जखमांची मलमपट्टी केली. त्या जखमा कोणत्या स्वरुपाच्या होत्या आणि त्या जखमा किती काळापूर्वीच्या होत्या, तेही नोंदवले. शासकीय वैद्यांच्या म्हणण्यानुसार, त्या जखमा त्यांनी तपासण्यापूर्वीच्या साधारण १ घंटा आधीच्या होत्या, म्हणजेच त्या सायंकाळी ६.३० वाजण्याच्या पुढेच कधीतरी झालेल्या होत्या, म्हणजेच हा आरोप धडधडीत खोटा होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याकडे पुरेशा संशयाने पाहिलेले नाही.
२. आडभाई यांनी त्यांच्या डोळ्यांत साधकांनी मिरचीची पूड टाकल्याचे सांगितले होते; परंतु वैद्यकीय अधिकार्याने डोळ्यांत तसे काहीच मिळाल्याचे निरीक्षण नोंदवलेले नाही.
३. डॉ. स्वाती आडभाई यांना साधकांनी कोंडून ठेवल्याचे म्हटले असले, तरी तसा कोणताच पुरावा समोर आणलेला नाही.
४. सर्वोच्च न्यायालयाने एकमेकांच्या विरोधात झालेल्या खटल्यांची सुनावणी कशी घ्यावी, याचे मापदंड घालून दिलेले आहेत. त्या मापदंडानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मंगला मोटे यांनी हे दोन्ही खटले चालवायला हवे होते; परंतु त्यांनी तसे केलेले नाही. त्यांनी दुसर्या खटल्यातील पंचनामा साधकांच्या विरोधातील खटल्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरला आहे. हे चुकीचे आहे.
५. साधक त्या जागी होते, हेही गृहीत धरले आहे.
६. बेकायदेशीर जमाव करण्यासाठी जे सामूहिक उद्दिष्ट लागते, ते काय होते, याचा कोणताही पुरावा नसतांना तसे गृहीत धरले आहे.
७. बाकी कोणतेच गुन्हे सिद्ध होत नसतील, तर ‘बेकायदेशीर जमाव केल्याचा गुन्हा झाला’, असे म्हणता येत नाही.
८. हे सर्व पहाता संबंधित सर्व साधकांना निर्दोष सोडण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात